भाजपाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी एक जावईशोध लावला आहे. महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या. आगरताळा या ठिकाणी असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे असे देब यांनी म्हटले आहे. इंटरनेट आणि सॅटेलाइट महाभारत काळापासून होते हेच संजय यांच्या दिव्यदृष्टीमागचे कारण होते असेही देब यांनी म्हटले आहे.

पीडीएस संदर्भातल्या कार्यक्रमात बिप्लब देब बोलत होते. सध्याचा काळ हा टेक्नोसॅव्ही आहे. इंटरनेटची प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र आपला देश हा कायम जगाच्या पुढे असलेला देश आहे. याचा मला अभिमान आहे असेही बिप्लब देब यांनी म्हटले. युरोप आणि अमेरिका तांत्रिक प्रगतीचे दावे करत आहेत. मात्र या तांत्रिक क्षेत्राचा जनक देश आहे तो भारत आहे असेही देब यांनी म्हटले आहे. डाव्यांची सत्ता उलथवून टाकत भाजपाने त्रिपुरात फडकावला. त्यानंतर बिप्लब देब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज मात्र एका कार्यक्रमात महाभारत काळापासून इंटरनेट होते असा अजब दावा त्यांनी केला आहे.

भाजपाच्या त्रिपुरामधील विजयामध्ये बिप्लब देब यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच ते मुख्यमंत्री होऊ शकले. आता त्यांनी देशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे आणि महाभारत काळापासून इंटरनेट आणि सॅटेलाइट होते असा जावईशोध त्यांनी लावला.