उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात दोन हिंदू पुजाऱ्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुजाऱ्यांची हत्या झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून स्थानिकांनी आंदोलन करत हत्येचा निषेध नोंदवला आहे. शेखरपूरा सतकाना ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मिलिक आणि बिजौली गावादरम्यान असणाऱ्या शिवमंदिरात ही घटना घडली आहे. हा परिसर निर्मनुष्य असून घरांमध्ये खूप अंतर आहे.

महंत कालिदास आणि सोनपाल अशी हत्या झालेल्या पुजाऱ्यांची नावे आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून ते मंदिरात राहत होते. रविवारी रात्री महंत, सोनपाल आणि शेजारच्या गावातील एक पुजारी मंदिराच्या छतावर झोपले होते. रात्री काही अज्ञातांनी मंदिराची भिंत ओलांडत मंदिराच्या छतावर प्रवेश केला. यावेळी त्यांनी काठी आणि विटांच्या सहाय्याने तिघांना जबरदस्त मारहाण केली. पुजाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र काही फायदा झाला नाही.

अखेर मध्यरात्री ३ वाजता गावकरी घटनास्थळी पोहोचले. मात्र कालिदास आणि सोपनाल यांचा मृत्यू झाला होता आणि महेंद्र मृत्यूशी झुंज देत होता. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस उशिरा आल्याने गावकरी संतापले आणि त्यांनी पोलिसांना मृतदेहांना हात लावण्यास नकार दिला. नंतर महेंद्र सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलीस याप्रकरणी तपास करत असून दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक म्हणजे हल्लेखोर दरोडा टाकण्यासाठी आले असावेत. दुसरी म्हणजे मंदिरालगत असलेल्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादामुळे हा हल्ला करण्यात आला असावा. अशाप्रकारे हल्ला होण्याची ही दोन दिवसांतील तिसरी घटना आहे.