Sandeshkhali Rape Case New Update : एकीकडे देशभरात लोकशाही निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील संदेशखाली बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. “पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम म्हणजे लोकसभा निवडणुकांआधी राज्याला बदनाम करण्याचे भाजपाचे कारस्थान होते”, असा आरोप राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने केला होता. या आरोपानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन महिलांची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यांच्या नावाने बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा या संबंधित महिलांने केला आहे. तसंच, या दोन महिलांनी बलात्काराची तक्रारही मागे घेतली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संदेशखाली प्रकरणात दोन महिलांनी बलात्काराची तक्रार केली होती. या दोन महिला सासू-सूना होत्या. या दोघींनीही प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एक महिला म्हणाली की, “ज्या दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने येथे भेट दिली, तेव्हा पियाली नावाच्या महिलेने काही महिलाना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले होते. मी त्यांना सांगितले की १०० दिवसांच्या नोकरीच्या योजनेत काम करूनही आम्हाला पैसे मिळाले नाहीत. मला फक्त ते पैसे हवे होते आणि इतर कोणतीही तक्रार नव्हती. बलात्कार झाला नाही. आम्हाला केव्हाही तृणमूलच्या कार्यालयात जबरदस्ती रात्रीचे बोलावण्यात आले नाही. पियालीने आम्हाला एका कोऱ्या पत्र्यावर स्वाक्षरी करायला सांगितले.” तृणमूलच्या स्थानिक नेत्यांनी बलात्काराचा केल्याचा आरोप करणाऱ्या महिलांच्या यादीत ती आहे हेही तिला नंतर कळले.

हेही वाचा >> बंगालच्या बदनामीचे कारस्थान! संदेशखाली प्रकरणी तृणमूलचा भाजपवर आरोप

भाजपाला शिक्षा झाली पाहिजे

महिलेच्या सुनेने पियालीवर संदेशखालीची बदनामी केल्याचा आरोप केला. “ती एक बाहेरची व्यक्ती आहे, ती दुसऱ्या कुठून तरी आली आहे आणि इथं बोलते. तिला इथल्या सगळ्यांबद्दल माहिती कशी आहे हे आम्हाला माहीत नाही. सुरुवातीला ती फक्त इथल्या आंदोलनात भाग घेत असे. नंतर आम्हाला कळले की ती त्यांच्यासोबत आहे. आमच्याशी खोटे बोलल्याबद्दल आणि आम्हाला फसवल्याबद्दल भाजपाला शिक्षा झाली पाहिजे.”

बलात्काराचा खोटा आरोप मागे घेण्याच्या निर्णयामुळे धमक्या आणि सामाजिक बहिष्काराच्या धमक्या या महिलांना दिल्या जात आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नवी तक्रार दाखल केली आहे.

तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव यांनी आरोप केला आहे की, संदेशखालीच्या धाडसी महिला भाजपाविरोधात बोलण्याचं धाडस दाखवत आहेत. हा पक्ष किती दिवस फसवणूक करत राहणार, स्वतःच्या राजकीय लालसेपोटी आपल्या माता-भगिनींच्या सन्मानाला निर्लज्जपणे पायदळी तुडवत राहणार?”

परंतु, तृणमूलकाँग्रेस आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर भाजपाने दिलं आहे. भाजपाच्या प्रवक्त्या प्रियंका टिब्रेवाल म्हणाल्या की, तृणमूलने हे समजून घेतले पाहिजे की सांडलेल्या दुधासाठी रडून काही उपयोग नाही. तृणमूल आता का प्रतिसाद देत आहे? ते दोन-तीन महिने शांत का होते. ते आधी म्हणाले (संदेशखालीच्या) स्त्रिया खोटे बोलत होत्या, आता ते म्हणत आहेत त्यांना खोटे बोलायला लावले. जे काही नुकसान व्हायचे होते ते झाले. आगीशिवाय धूर निघत नाही”, असं त्यांनी तिने एनडीटीव्हीला सांगितले.

तृणमूल काँग्रेसने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली असून, संदेशखळी प्रकरणात बनावट आरोप केल्याचा आरोप केला आहे.