जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी आणि सध्या मोदी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असलेले एस. जयशंकर आणि निर्मला सीतारामन यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थ्यांनी घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या हल्ल्यावर पहिल्यांदा ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले, जेएनयूतील हिंसाचाराची छायाचित्रे मी पाहिली. हे अत्यंत वेदनादायी असून याचा मी निषेध करतो. हा प्रकार विद्यापीठाची परंपरा आणि संस्कृतीच्या पूर्णपणे विरोधी आहे.

जयशंकर यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देखील या घटनेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, जेएनयूतील छायाचित्रं भयानक आहेत. मला आठवतय की जेएनयू पूर्वी एक अशी जागा होती जिथे वाद-विवाद आणि आपली मत मांडली जायची मात्र, कधीही हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. त्यामुळे मी स्पष्टपणे या घटनेचा निषेध नोंदवते. आमच्या सरकारसाठी विद्यापीठं ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाणं हवीत.

आणखी वाचा – JNU Violence: पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाथा मारल्या – प्रियंका गांधी

त्याचबरोबर, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देखील जेएनयूतील हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा ट्विटच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे.