दक्षिण चीन सागरातील चीनची वाढती दादागिरी रोखण्यासाठी अमेरिकन नौदलानेही या समुद्रात आपली गस्त वाढवली आहे. संपूर्ण दक्षिण चीन सागरावर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने इथे अनेक कृत्रिम बेटे तयार केली आहेत. अमेरिकन नौदलाची विनाशिका (डिस्ट्रॉयर) शुक्रवारी चीनच्या कृत्रिम बेटापासून १२ मैल अंतरावर होती अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकन नौदलाची अशा प्रकारची गस्त चीनला अजिबात मान्य नसून अमेरिकन नौदलाच्या कृतीने चीनचा पारा नक्कीच चढला असणार.

अमेरिकेची मस्टइन विनाशिका दक्षिण चीन सागरात मिसचीफ रीफ जवळ गेली होती. तिथे जाऊन या विनाशिकेने विविध कसरती केल्या असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मिसचीफ रीफ जवळच्या सागरी हद्दीवरुन चीनचा शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहे.

चीनच्या कृत्रिम बेट बांधून तिथे लष्करी कुमक पाठवण्यावर अमेरिकेने अनेकदा तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसारच आपण सागरी गस्त घालतो असे अमेरिकेने म्हटले आहे. आम्ही नेहमीच गस्त आणि कसरती करत असतो. यापूर्वी सुद्धा आम्ही अशा प्रकारे गस्त घातली असून भविष्यातही हे चालू राहिल असे अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे लेफ्टनंट कमांडर निकोल यांनी सांगितले.