भारतासह पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नायजेरिया आणि घाना या देशांतून येणाऱ्या नागरिकांकडून ब्रिटनप्रवेशासाठी तब्बल ४,३५० डॉलरचा ‘व्हिसा बॉण्ड’ वसूल करण्याची वादग्रस्त योजना लागू होणार असल्याचे ब्रिटनच्या गृह मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले.
अर्थात ही घोषणा एका ईमेलद्वारे नायजेरियातील लागोस येथे वृत्तसंस्थेला प्राप्त झाली असून त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून सुरू होईल, याचा तपशील त्यात नाही. बॉण्डची ही रक्कम ब्रिटन सोडताच परत केली जाणार आहे. हा बॉण्ड वंशभेद व धर्मभेद करणारा असल्याची टीका या देशांतून उमटली असून ब्रिटनमध्येही त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर या सहा देशांसाठी ही योजना लागू होत असून नंतर त्याची व्याप्ती वाढवून अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांनाही त्यात समाविष्ट केले जाईल, असे या ईमेलमध्ये म्हटले आहे. या सहा देशांतील सुमारे पाच लाख नागरिकांनी गेल्या वर्षी ब्रिटनच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. या देशांतील नागरिकांना ब्रिटनने ‘अत्यंत जोखमीचे’ ठरविले असून त्यामुळेच ही व्हिसा बॉण्डची कल्पना पुढे आली आहे.
या व्हिसा बॉण्डमुळे मुदत संपल्यानंतरही वास्तव्य लांबवत जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालता येईल तसेच हे नागरिक ब्रिटनमधील ज्या नागरी सेवांचा लाभ घेतात त्यांचीही भरपाई होईल, असे मत ब्रिटनच्या गृह खात्याने व्यक्त केले आहे. सर्वोत्तम व कुशल परदेशी नागरिकांचे ब्रिटनमध्ये नेहमीच स्वागत असेल मात्र गैर मार्गाने वा गैर प्रकाराने ब्रिटनमध्ये घुसणाऱ्या व वास्तव्य लांबवणाऱ्या लोढय़ांना आळा घालण्याचा या बॉण्डचा हेतू आहे, असेही गृह खात्याने म्हटले आहे.