अमेरिका ही जगातील एकमेव महासत्ता आहे आणि तेथे होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीचा आणि तिच्या निकालाचा संपूर्ण जगाबरोबरच भारतावरही बरावाईट परिणाम होणार आहे. तो नेमका कसा होईल याचा अंदाज हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन प्रमुख उमेदवारांच्या जाहीर भूमिकेवरून बांधता येईल.

अमेरिका हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश आहे. दोन्ही देशांतील वार्षिक व्यापार सध्या १०० अब्ज डॉलरच्या आसपास आहे. नजिकच्या काळात तो ५०० अब्ज डॉलरच्या घरात नेण्याचा दोन्ही देशांचा मानस आहे. भारतासाठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसाय, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्य, व्हिसा धोरण आदी विषय महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने हिलरी आणि ट्रम्प यांची धोरणे कशी प्रभावशाली ठरू शकतील हे पाहणे उद्बोधक आहे.

व्यापार..

अमेरिकेला पुन्हा वैभवशाली आणि महान देश बनवणे ही ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यासाठी परदेशी नागरिकांचे स्थलांतर रोखणे, व्यापारी आणि आर्थिक र्निबध आदी त्यांची धोरणे आहेत. त्यांचा रोख मुख्यत्वे चीनकडे असला तरी त्याचा परिणाम भारतावरही होईल. ट्रम्प यांनी व्हिसा आणि आऊटसोर्सिगवर र्निबध आणले तर भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला फटका बसू शकतो. भारतीय आयटी क्षेत्र मोठय़ा प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत भारताने या क्षेत्रातील निर्यातीतून ८२ अब्ज डॉलर मिळवले. त्यातील मोठा हिस्सा अमेरिकेबरोबरील व्यापारातून आला होता. या बाबतीत ट्रम्प यांच्या तुलनेत हिलरी यांचे धोरण काहीसे खुले असले तरी अमेरिकी मतदारांनी त्यांच्याकडे खुलेपणाने देशातील नोकऱ्या दुसरीकडे जाऊ देणाऱ्या नेत्या म्हणून पाहणे त्यांनाही परवडणारे नाही.

ट्रम्प यांचा भर चीन आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या स्वस्त वाहनांवर र्निबध लागू करण्यावर आहे. मात्र अमेरिका जागतिक व्यापारी संघटनेचा सदस्य देश असल्याने ते असे एखाददुसऱ्या देशावर र्निबध लागू करू शकणार नाहीत. त्याचा परिणाम भारतावरही होईल. त्या स्थितीत फोर्ड कंपनीच्या भारतातून अमेरिकेत होणाऱ्या वाहनांच्या निर्यातीवर परिणाम होईल. त्याउलट हिलरी यांचे धोरण भारताशी घनिष्ट व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचे आहे. भारताशी व्यापारउदीम वाढवल्याने भारतासह दक्षिण आशियातही सुबत्ता येण्यास मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

संरक्षण आणि परराष्ट्र धोरण..

संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचा विचार करता डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन यापैकी कोणत्याही पक्षाचे सरकार अमेरिकेत आले तरी फारसा फरक पडणार नाही. अमेरिकेच्या दृष्टीने भारताचे जागतिक व्यापारातील, सत्तासमतोलातील आणि दहशतवादविरोधी लढाईतील महत्त्व इतके वाढले आहे की कोणतेही सरकार भारताकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. ट्रम्प किंवा हिलरी यांच्या या विषयातील धोरणात लहानसहान फरक असले तरी ढोबळमानाने भारतविषयक धोरणात फरक पडणार नाही. शीतयुद्धाच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष भारतासाठी चांगले असा समज होता. जॉन एफ. केनेडी यांच्यासारख्या डेमोक्रॅटिक अध्यक्षाच्या भारतमैत्रीने त्याला दुजोरा मिळाला होता. तर शीतयुद्धाच्या अखेरीस त्यात बदल होऊन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भारतासाठी चांगले मानले जाऊ लागले. जॉर्ज बुश यांच्या काळात झालेला भारत-अमेरिका अणुसहकार्य करार हे त्याचे उदाहरण म्हणून सांगितले जाते. सध्याच्या जगात तसा फरक फारसा उरलेला नाही. इस्लामी दहशतवाद आणि चीनच्या वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज लागणार आहे आणि अलीकडच्या सरकारच्या ‘एशिया पिव्हॉट’ धोरणातून ते स्पष्ट होते. या निवडणुकीनंतर कोणतेही सरकार आले तरी त्यात फारसा फरक पडणार नाही.

स्थलांतर..

स्थलांतराविषयी (इमिग्रेशन) धोरणाचाही भारतावर मोठा परिणाम होणार आहे. भारतीय कंपन्यांतून बहुतांशी आयटी अभियंते अमेरिकेत ‘एच-१ बी’ या प्रकारच्या व्हिसाच्या माध्यमातून जातात.  ‘एच-१ बी’ व्हिसा सरसकट बंद करणे हे ट्रम्प यांचे धोरण होते. पण प्रत्यक्षात तसे करणे शक्य नाही. हिलरी यांनीही त्यावर काही र्निबध आणण्याची भाषा केली होती. पण हिलरी यांची पावले ट्रम्प यांच्या तुलनेत नक्कीच सौम्य असतील. अमेरिकेने नुकतीच ‘एच-१ बी’ व्हिसाची फी २००० वरून ४००० डॉलरवर नेली होती. त्याने भारतीय आयटी क्षेत्राला ४०० दशलक्ष डॉलरचा फटका बसला होता.

व्हिसा र्निबधांपेक्षा स्थलांतरावर र्निबध हे अधिक गंभीर परिणाम  करणारे असतील. परदेशांतील भारतीयांकडून देशात परत पाठवले जाणारे पैसे (फॉरिन रेमिटन्सेस) हा देशासाठी उत्पन्नाचा आणि परदेशी चलनाचा (फॉरेक्स) मोठा स्रोत आहे. अनिवासी भारतीयांनी २०१२ साली देशात ७०.३९ अब्ज डॉलर पाठवले होते. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) त्याचे प्रमाण ४ टक्के इतके होते. त्यातील ११ अब्ज डॉलर अमेरिकेतील भारतीयांकडून आले होते. ट्रम्प निवडून आले आणि त्यांनी हे र्निबध लादले तर त्यावर मोठा परिणाम होईल. त्या तुलनेत हिलरी यांची भूमिका थोडी सौम्य असेल.