नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. योगी यांनी शहा यांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली असून ते शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून योगींची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. २०१७ मध्ये भाजपने राज्यात मोठे यश मिळवून सत्तापरिवर्तन घडवले होते. पाच वर्षांनंतर ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून त्यासाठी पक्ष संघटना सक्रिय केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी लखनौला भेट देऊन प्रदेश भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. दिल्लीत परत आल्यावर, उत्तर प्रदेशमध्ये योगी हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे ट्वीट संतोष यांनी केले व राज्यात नेतृत्वबदलाच्या शक्यता फेटाळल्या. उत्तर प्रदेशचे प्रभारी राधामोहन सिंह यांनीही मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे सांगितले.