उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या पर्यटक व यात्रेकरूंची सुटका करण्याच्या मदतकार्याला आज शनिवार वेग आला आहे. काल शुक्रवार रात्रीपर्यंत ढगाळ हवामानाशी झगडत लष्कराचे मदतकार्य सुरू होते. आज सकाळपासून योग्य हवामान असल्याने गौरीकुंड पट्ट्यात लष्कराला हॅलिकॉप्टर उतरविण्यात यश आले. गौरीकुंड-केदारनाथ येथिल रामबारा भागात अडकलेल्या १००० पर्यटकांपर्यंत लष्कराचे जवान पोहचले असून, बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.  तरी, काही ठिकाणी हवामान अजूनही प्रतिकूल असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिराच्या मार्गावरील परिसरात किमान एक हजार पर्य़टक अडकले असल्याचे सुरक्षा दलांना आढळून आले.  जवळपास आठवडाभर उपाशी राहावे लागल्याने त्यांच्यापैकी बहुतेक जण आजारी पडले आहेत. अशा पर्यटकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी आणले जात असल्याचेही सुत्रांनी सांगितले. तसेच आज सकाळी धारासू पट्ट्यातून १७ विदेशी पर्यटकांना वाचविण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे