माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे आज दिल्लीतील एम्स रूग्णालयात निधन झाले. पाच दशकातील आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार वाजपेयींनी पाहिले होते. आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीद्वारे ते विरोधकांना सळो की पळो करून सोडत. विरोधात असताना त्यांनी अनेकवेळा सरकारला अडचणीत आणले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे विद्यमान भाजपा सरकारला अनेक महिन्यांपासून टीका सहन करावी लागत आहे. याच मुद्यावरून वाजपेयी यांनी ४५ वर्षांपूर्वी असाच विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधी सरकारवर याच मुद्यावरून हल्ला केला होता.

पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे वाजपेयींनी बैलगाडीत संसदेत येऊन आपला विरोध नोंदवला होता. न्यूयॉर्क टाइम्सने १२ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना संसदेत विरोधी पक्षाच्या संतापाला तोंड द्यावे लागले होते. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे त्यावेळी डावे आणि इतर विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
जनसंघाचे नेते असलेले वाजपेयी आणि इतर दोन सदस्य बैलगाडीत संसदेत आले होते. त्याशिवाय अनेक खासदार हे सायकलवर संसदेत आले होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे बग्गी (घोडा गाडी) यात्रेला त्यांनी विरोध केला होता. नागरिकांना पेट्रोल वाचवण्याचा संदेश देण्यासाठी इंदिरा गांधी यांनी बग्गी यात्रेचे आयोजन केले होते.

इंधन संकटादरम्यान तेल विक्री करणाऱ्या मध्य-पूर्व देशांनी भारताला कच्चे तेल पाठवण्याचे प्रमाण कमी केले होते. त्यामुळेच इंदिरा गांधी यांच्या सरकारने इंधनाच्या किंमतींमध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाढ केली होती. त्यामुळेच अटलजी यांच्यासह इतर नेत्यांनी आंदोलन केले होते.