अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर करावे असा दबाव यूपीए सरकारवर आणण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २५ ऑगस्टपासून उत्तर प्रदेशात १९ दिवस पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ही पदयात्रा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्य़ातून २५ ऑगस्ट रोजी निघेल आणि १३ सप्टेंबर रोजी अयोध्येत ती समाप्त होईल, असे विश्व हिंदू परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकार सदर विधेयक मंजूर करण्यास अपयशी ठरले तर परिषदेच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी अयोध्येत साधूसंतांचा महाकुंभ आयोजित करण्यात येईल आणि त्यावेळी या मागणीबाबत अंतिम इशारा दिला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उच्चस्तरीय समितीची बैठक परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली (केंद्रीय मार्गदर्शक मंडळ) बुधवारी येथे पार पडली. त्यामध्ये महाकुंभबाबतचा ठराव करण्यात आला.
पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या बैठकीला सिंघल यांच्यासह प्रवीण तोगडिया, स्वामी चिन्मयानंद  व २०० पदाधिकारी हजर होते.