उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कुख्यात गुंड विकास दुबेला ठार केल्यानंतर शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी ठार झाले होते. यानंतर कुटुंबीयांकडून वारंवार आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली जात आहे.

आणखी वाचा- ताफ्याचं हरवलेलं लोकेशन, जोरदार पाऊस अन्… ; जाणून घ्या दुबेला झाशीवरुन आणताना प्रवासात काय काय घडलं?

पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाल सिंह यांचा विकास दुबेकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे. आज पोलिसांनी जे काही केलं आहे त्यामुळे माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे. मी पोलीस प्रशासन आणि योगी सरकारचे आभार मानतो”.

आणखी वाचा- ३० वर्षात पाच हत्या, ६२ गुन्हे यूपीचा खतरनाक गँगस्टर विकास दुबे

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.