गाझा पट्टय़ात हिंसाचार सुरू असून इस्रायलवर पॅलेस्टाइनने अग्निबाण हल्ले केले. त्याआधी इस्रायलने गाझा सीमेवर निदर्शकांना रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात सहा पॅलेस्टिनी ठार तर इतर २१ जण जखमी झाले आहेत. गाझा शहराचा पूर्व भाग व खान युनिस येथील सीमेवर आठवडाभर हिंसाचार सुरू आहे.

अहमद अल हिरबावी, शादी दावला, अबेद अल वाहिदी व नाबील शरीफ हे विशीतील तरुण अल शुजायेह येथे गोळीबारात ठार झाले, तर पंधरा वर्षांचा महंमद अल रकीब हा इस्रायली सैनिकांनी केलल्या गोळीबारात खान युनिस येथे ठार झाला. गाझाच्या हमास शासित सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत. इस्रायली सुरक्षा दलांनी सांगितले, की किमान ४०० पॅलेस्टिनी सुरक्षा दलांवर चालून आले व दगडफेक करीत टायर जाळले त्या वेळी इस्रायली दलांनी त्यांना प्रतिकार केला. गाझा पट्टीत हमास या इस्लामी गटाचे राज्य आहे. त्यांनी शुक्रवार हा इस्रायलविरोधी कारवायांचा दिवस म्हणून पाळण्याचे ठरवले आहे.
अरब व इस्रायली यांनी सुरुवातीला एकमेकांना भोसकले. त्यातून चकमकी सुरू झाल्या असून तीन आठवडे हिंसाचार सुरूच आहे. इस्रायलच्या डिमोना शहरात एका किशोरवयीन मुलाला चार पॅलेस्टिनींनी भोसकले. तो स्थानिक पालिकेत काम करीत होता.
या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी सांगितले, की अरबांविरोधातील हिंसाचाराचा आपण निषेध करीत आहोत. हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर जवान तैनात करण्यात आले आहेत.