विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; सरकारकडून कन्हैया कुमारवरील कारवाईचे समर्थन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या नेत्यावर नोंदविण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्य़ाविरुद्ध विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आवाज उठविला तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा आक्षेपार्ह होत्या, असे सरकारने स्पष्ट केले.

संसदेच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकारावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर स्पष्टीकरण देण्याची तयारी मोदी यांनी दर्शविली. आपण भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहोत, असे मोदी यांनी या वेळी विरोधकांना निक्षून सांगितल्याचे संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची सरकारची तयारी आहे. या बैठकीत जसे खेळीमेळीचे वातावरण आहे तसेच वातावरण संभागृहातही राहील, अशी अपेक्षा मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केली. संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे, अशीच सर्वाची इच्छा असल्याचे दिसले, असे नायडू म्हणाले.

काँग्रेस देशविरोधी शक्तींना पाठिंबा देत असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. तेव्हा काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, भारताचे ऐक्य आणि घटना याविरुद्ध घोषणा देणाऱ्यांचे काँग्रेस कुठल्याही प्रकारे समर्थन करीत नाही, मात्र अटक करण्यात आलेला विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याने देशद्रोह केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळेच भाजपने केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे, असेही आझाद म्हणाले.

विहिंप, बजरंग दलाची निदर्शने

संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या निषेधार्थ मंगळवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेर जोरदार निदर्शने केली. सदर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या प्रतिमेचे दहन केले. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. तथापि, निदर्शकांना विद्यापीठाच्या संकुलात प्रवेश करण्यात सुरक्षारक्षक आणि तेथे तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी मज्जाव केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे केली.

प्रतिकार करण्याची कृती नैसर्गिक – शर्मा

नवी दिल्ली : पतियाळा हाऊस न्यायालयाच्या संकुलात एका गटाने आपल्यावर हल्ला केला, त्यामुळे त्याला प्रतिकार करण्याची आपली कृती नैसर्गिक होती, असा दावा दिल्ली भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांनी मंगळवारी केला.

शर्मा हे विश्वासनगर मतदारसंघातील आमदार आहेत. आपण न्यायालयातून बाहेर पडत असताना तेथे जमलेल्या काही जणांनी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या, त्यामुळे तेथे वादावादी झाली. त्यांच्या घोषणांना आपण जोरदार हरकत घेतली, तेव्हा त्यांनी आपल्याला मारहाण केली आणि ते पसार होऊ लागले. तेव्हा आपण आणि अन्य काही जणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यानंतर सोमवारी काय घडले ते सर्व पुरावा म्हणून उघड आहे, असे शर्मा म्हणाले.

जाकीट परिधान केलेल्या व्यक्तीला काही जण मारहाण करीत असल्याचे प्रसिद्ध झालेले छायाचित्र आपले नाही, मात्र दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी ते आपले असल्याचे म्हटले आहे, असा दावाही शर्मा यांनी केला. जर कोणी आपल्याला मारहाण केली तर त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया उमटणारच आणि सोमवारीही तसेच घडले. मला मारहाण झाल्यामुळेच माझ्याकडूनही प्रतिकार करण्यात आला. माध्यमांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले, असेही शर्मा म्हणाले.