पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशभरात नागरिकांनी आपल्या घरातले लाईट घालवत, दिवे पेटवून करोनाविरुद्ध लढ्यात आपला सहभाग नोंदवला. मात्र देशातील काही भागांमध्ये लोकांनी यावेळेलाही नियमांचा भंग केलाच. काही लोकं हातात मशाली घेऊन रस्त्यावर उतरले होते, तर काही ठिकाणी लोकांनी फटाके फोडले. सोलापूर, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये आग लागण्याच्याही घटना घडल्या. सध्याच्या खडतर काळातही नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं आहे.

करोनाविरुद्ध आपलं युद्ध अद्याप संपलेलं नाही, त्यामुळे लोकांनी घरातचं थांबावं. ही वेळ फटाके फोडण्याची नाही अशा शब्दांत गंभीरने नियम मोडणाऱ्यांना टोला लगावला आहे.

गौतम गंभीरने याआधीही पंतप्रधान सहायता निधीसाठी खासदार निधी दिला आहे. “करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं होतं. राजकीय नेत्यांनीही मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.