निवडणूक आयोग म्हणेल तेच खरं असे होऊ शकत नाही. उमेदवाराने इव्हीएमसंदर्भात तक्रार केल्यास निवडणूक आयोगाकडून व्हीव्हीपॅटमधील मतदान केल्याच्या पावत्यांची पुन्हा मोजणी करायलाच हवी अशी ठाम भूमिका पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल यांने मांडली आहे.


मतदान यंत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत हार्दिकने सुरुवातीपासूनच भाजपला टार्गेट केले होते. निवडणूक आयोग आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचा आरोपही हार्दिकने केला होता. अखेर मतमोजणीनंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हार्दिकने निवडणूक आयोगावर निशाणा साधला.


दरम्यान, गुजरातच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा एक मजबूत विरोधीपक्ष म्हणून उदय झाला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष म्हणून ते जनतेसाठी कशी भूमिका बजावतात हे आम्ही पाहणार आहोत, असे सांगत हार्दिकने काँग्रेसलाही इशारा दिला.

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या दोन्ही राज्यांत भाजप स्पष्ट बहुमतासह विजयी झाला. मात्र, भाजपच्या विजयामागे मतदान यंत्रांची छेडछेड हे कारण असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला होता.