सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाचे आम आदमी पक्षाने पहिल्यापासून समर्थन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अनुराग कश्यप याची बाजू उचलून धरताना ‘आप’च्या नेत्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने या चित्रपटाच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार करण्यास सुरुवात केली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर ‘आप’ने सर्वाधिक लक्ष पंजाबमधील निवडणुकीकडे केंद्रीत केले. पंजाबमध्ये सत्तेवर आल्यास अमली पदार्थांच्या व्यसनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील तरूण-तरुणींना या विळख्यातून बाहेर काढू, असे आश्वासन ‘आप’ने आधीच दिले आहे. त्यातच याच विषयावर बेतलेला चित्रपट अगदी मोक्याच्या वेळीच प्रदर्शित होत असल्यामुळे ‘आप’ला त्याचा फायदाच होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनुराग कश्यप याला पाठिंबा दिला. पंजाबमधील वास्तव काय आहे, हे संपूर्ण देशासमोर येण्याची गरज असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्याचवेळी सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख पहलाज निहलानी यांच्या विरोधात येणाऱ्या ट्विट्सना रिट्विट करण्याचे कामही त्यांनी केले.
‘आप’चे नेते राघव चढ्ढा यांनी थेटपणे भाजप आणि अकाली दलावर हल्ला करताना ट्विट केले की, प्रत्येक गोष्टीला ‘आप’शी जोडण्याचा प्रयत्न करण्यातून हे स्पष्टपणे दिसते की भाजप आणि अकाली दलाचे नेते घाबरून गेले आहेत. आमच्या पक्षाला पंजाबमध्ये मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.
कुमार विश्वास यांनी तर पहलाज निहलानींची तुलना थेट दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त बस्सी यांच्यासोबतच केली.