उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकांनाही कॉलेज-विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये मोबाईल फोन वापरता येणार नाही. उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाकडून याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.

‘राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी उत्तम अध्यापनाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी’ उच्च शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक जारी केल्याचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलं आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या एका निरीक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक कॉलेजमधील बहुतांश वेळ मोबाईल फोनवर वाया घालवत असल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांवर देखील ही बंदी असेल असं परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर वापरण्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. महत्त्वाच्या बैठकींदरम्यान काही मंत्री व अधिकारी व्हॉट्सअॅप मेसेज वाचण्यात गुंग असल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवरील बंदीच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.