12 July 2020

News Flash

जाहीर अवहेलना

मेरिकेत चारचौघांत मुद्दाम केलेल्या अवहेलनेच्या (पब्लिक शेमिंग) घटनांचं प्रमाण हल्ली वाढताना दिसते आहे.

रसेल फ्रेडरिकच्या अ‍ॅटलांटा (जॉर्जिया) येथे हेअर कटिंग सलूनमध्ये हा मुलांना विरूप करणारा..

 फ्लोरिडा

मेरिकेत चारचौघांत मुद्दाम केलेल्या अवहेलनेच्या (पब्लिक शेमिंग) घटनांचं प्रमाण हल्ली वाढताना दिसते आहे.  सुजाण नागरिकांना मात्र ही समाजस्वास्थ्य बिघडवणारी गोष्ट वाटते. प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात या प्रवृत्तीची मुळं खोलवर रुजलेली आढळतात. येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यापासून ते वर्गात लहान मुलीला गृहपाठ न केल्यामुळे ‘कोंबडा’ बनून तासन् तास बसवण्याची शिक्षा (जी दुर्दैवाने देहान्ताची ठरली!), जातपंचायतीने दिलेल्या अपमानास्पद शिक्षा (धिंड काढणे, वाळीत टाकणे) या अशाच घटना होत. अमेरिकेपुरतं बोलायचं तर अशी शिक्षा १९ व्या शतकापर्यंत बऱ्याचदा कृष्णवर्णीयांना दिली जाई. मध्यंतरी ती अस्त पावली असं वाटेतो तिचं काही अंशी पुनरागमन झालेलं दिसतं.

पहिल्यांदा केलेल्या लहानशा चोरीसारख्या गुन्ह्य़ाकरता कोर्ट हल्ली ही शिक्षा देतं. गुन्हेगाराने आपल्या गळ्यात पाटी अडकवून काही दिवस (एखादा आठवडा) वर्दळीच्या रस्त्यावर दिवसाचे सात-आठ तास उभं राहायचं अशी ही शिक्षा असते. ही पाटी पुठ्ठा वा जाड पेपरची असते. गुन्हेगाराचा गुन्हा आणि त्याचा पश्चात्ताप असं सगळं या पाटीवर ठळक अक्षरांत लिहिलेलं असतं. करदात्यांच्या पैशाची बचत, तुरुंगातील जागेची टंचाई, प्रथमच (तुलनेने लहान) गुन्हा करणाऱ्याला समाजात राहून सुधारण्याची संधी देणे असे सगळे हेतू या शिक्षेने साध्य होतात अशी यामागची विचारधारा आहे.

भुरटय़ा चोरांकरता कदाचित ही योग्य शिक्षा असेल; परंतु शाळकरी मुलांना जेव्हा पालक ही शिक्षा देतात तेव्हा त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. ज्या पालकांना असं वाटतं, की मुलांना धडा शिकवायला हे हत्यार चांगलं आहे, अशांची संख्या सध्या जरी कमी असली तरी हळूहळू ती वाढताना दिसते आहे. नुकतीच साऊथ कॅरोलिनामधील एक बातमी वाचली. दहा वर्षांच्या आपल्या मुलाला मुलीचे तोकडे कपडे घालून, अगदी बारीक हेअर कट करून डोक्याच्या मागच्या बाजूवर ‘बॅड’ असं मार्करने लिहून आणि त्याच्या शर्टावर मार्करने त्याच्या गुन्ह्य़ाचं वर्णन करून त्याच्या आईने वॉलमार्टसारख्या गर्दीच्या दुकानाच्या परिसरात उभं केलं. शाळेत वर्गात शिक्षकांना उलट उत्तरं करणं, वर्गातल्या मुलांवर हात उगारणं अशा त्याच्या वागण्यापायी शिक्षकांच्या होणाऱ्या तक्रारी थांबविण्याचा मार्ग म्हणून घरी दिलेला चोप व आरडाओरडा या कशाचाही उपयोग झाला नव्हता. मग भररस्त्यात अशा तऱ्हेने त्याची धिंड काढण्याचा हा शेवटचा उपाय तिने शोधला. काही बघ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी बाईला समज दिली आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे शेजारच्या जॉर्जिया राज्यात जरी मुलांना विरूप करणारा हा स्पेशल हेअरकट बराच प्रचारात असला तरी कॅरोलिनामध्ये मात्र तो फारसा प्रचलित नाही. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मुलांची मानखंडना करणारा हा हेअरकट आणि इतर प्रकार पसरत चाललेले दिसताहेत. आणि ही चिंतेचीच बाब आहे.

रसेल फ्रेडरिकच्या अ‍ॅटलांटा (जॉर्जिया) येथे हेअर कटिंग सलूनमध्ये हा मुलांना विरूप करणारा.. शिक्षा देणारा हेअरकट करण्याची सुरुवात झाली. या हेअरकटला ‘बेंजामिन बटन स्पेशल’ असं म्हणतात. डोक्याच्या पुढच्या भागात एक लहानसा केसांचा पुंजका ठेवून बाकी केस अगदी बारीक कापले जातात. (याला ‘म्हाताऱ्याचा हेअरकट’ असंही म्हणतात.) फ्रेडरिक आठवडय़ातले तीन दिवस आपल्या सलूनमध्ये हा हेअरकट फुकट देतो. तो या हेअरकटचं समर्थन करतो. शिक्षा म्हणून दिलेला हा कट काम करतो असं त्याचं म्हणणं आहे. मुलांचं वागणं सुधारून त्यांच्या ग्रेड्स चांगल्या होतात. पालकांना जे वेगवेगळ्या शिक्षा देऊन जमत नाही, ते या हेअरकटने जमतं असा त्याचा दावा आहे. अर्थात मुळातच मुलांच्या चुकांकरता त्यांना विरूप करून लोकांपुढे आणायची ही शिक्षेची पद्धत योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे.

या शिक्षेला विरोध करणारे पाच-सहा महिन्यांपूर्वी टाकोमा (वॉशिंग्टन) इथे राहणाऱ्या १३ वर्षांच्या इझबेल या मुलीने केलेल्या आत्महत्येचा दाखला देत या शिक्षेविरुद्ध बोलतात. इझबेलने वेगवेगळ्या अँगल्सने स्वत:चे काढलेले काही फोटो (जे काहीसे उच्छृंखल होते.) एका मुलाला पाठवले होते. दोन वेळा तिच्या वडिलांनी तिला समज दिली होती, पण त्याचा म्हणण्यासारखा उपयोग झाला नाही. तेव्हा वडिलांनी रागाने तिचे लांब, सुंदर केस वेडेवाकडे कापले. शरमेने खाली मान घातलेल्या, समोर कापलेल्या केसांचा ढीग असलेल्या इझबेलचा व्हीडिओ कॅमेऱ्याने काढलेला फोटो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. शरमेने चूर झालेल्या इझबेलला दुसऱ्या दिवशी शाळेतल्या शिक्षिकांनी केसांचा फ्रेंचरोल करून थोडीशी मदत केली. पण १३ व्या वर्षी स्वत:च्या सुंदर केसांचं झालेलं विद्रुपीकरण, ट्विटरवर पसरलेली बातमी, शाळेतल्या मित्र-मैत्रिणींच्या नजरा हे सगळं इझबेलच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. काही दिवसांनी तिने एका ओव्हर ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा या शिक्षेविरोधात जनमत उसळून आलं. चुकणाऱ्या मुलांना समज द्यायला या प्रकाराचा उपयोग करणारे पालक शपथेवर सांगतात की, मुलांवर त्याचा चांगला परिणाम होतो. पालकांना हिंसक न होता आपल्या रागाला वाट करून दिल्याचं समाधान मिळतं. अपमानित झालेली मुलं पालकांना खूश करायला स्वत:ची वर्तणूक सुधारतात असा दावाही बरेचजण करतात. मोठय़ा शहरांत हातात आपल्या चुकीचा कबुलीजबाब देणारे बोर्ड घेऊन उभी असलेली मुलं हळूहळू वाढत्या संख्येने दिसू लागली आहेत.  स्वत:चा ‘गुन्हा’ लिहिलेला बोर्ड धरून कधी उघड रडणारी, तर कधी तोंड बोर्डाआड लपवणारी मुलं बघणं समंजस पालकांना जड जातं. ‘मी खोटं बोलते. मोठी झाल्यावर मी तुरुंगाची हवा खायला जाणार’, ‘मला परीक्षेत तीन एफ्स मिळालेत. माझी आई माझ्यासाठी खूप श्रम करते, मी तिला फक्त दु:ख देते’,  ‘मी बुली (गुंड) आहे. शाळेत मी मुलांना खूप छळतो. तुम्हाला बुली आवडत नसले तर हॉन्क (गाडीचा हॉर्न वाजवा) करा’ अशा तऱ्हेच्या पाटय़ा गळ्यात घालून तासन् तास रस्त्यात उभं राहणाऱ्या मुलांना  आपल्या आई-वडिलांबद्दल प्रेम, आदर, राग, निराशा.. यापैकी काय वाटत असेल याचा अंदाज करणं अवघड नाही. मुलांच्या मानसिकतेवर या शिक्षेच्या होणाऱ्या बऱ्या(?)वाईट परिणामांचा पुरेसा अभ्यास अजून झालेला नाहीये.

बोर्ड हातात देण्याव्यतिरिक्त मुलांना शरम वाटेल अशी केशभूषा करणं, त्यांच्या शर्टावर अपमानास्पद ओळी लिहिणं अशी शिक्षा काही पालक देतात.  सोशल मीडिया व  इंटरनेटमुळे या बातम्या कमीत कमी वेळात सर्वदूर पसरायला वेळ लागत नाही. या अवहेलनेची शिकार झालेल्या व्यक्तींचं भावी आयुष्य असुरक्षित होण्याचा मोठा धोका आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सुजाण शिक्षक या जाहीर अवहेलनेविरोधात बोलतात. ‘मुलांशी संवाद साधा, त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायला प्रोत्साहन द्या, मुख्य म्हणजे त्यांना वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐका..’ असं पालकांना ते कळकळीने सांगतात. पण अमेरिकेत तरीही या शिक्षेची मात्रा वाढतेच आहे. या शिक्षेमुळे अपमानित झालेली मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळा त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी शाळेशी संलग्न पोलीस खात्याचीही मदत घेतात.

एका आईने आपल्या १२ वर्षांच्या मुलीला खूप मारले आणि तिच्या गणवेशाच्या शर्टवर ती कशी वाया गेली आहे, आणि किती उद्धट बोलते, वगैरे मजकूर मार्करने लिहिला. शाळेच्या व्यवस्थापनाने लगेचच पोलिसात त्या स्त्रीविरुद्ध तक्रार केली. असं असलं तरी काही शाळाही या शिक्षेच्या आरोपातून सुटलेल्या नाहीत. छडी, पट्टी व हाताने विद्यार्थ्यांना मारणं बंद झालं असलं तरी त्याची जागा इतर शिक्षांनी घेतली आहे. वर्गातल्या इतर मुलांदेखत जेव्हा एखाद्या मुलाला वा मुलीला शिक्षा होते तेव्हा तो जाहीर अवहेलनेचाच प्रकार असतो. लहान वर्गात (पहिली-दुसरी) मुलांनी बुक बॅग ठरलेल्या जागी ठेवली नाही म्हणून एका शिक्षकाने ती ट्रॅश कॅनमध्ये टाकली, गृहपाठाच्या पेपरवर नाव लिहिलं नाही म्हणून मुलाचा पेपर वेस्ट-पेपर बास्केटमध्ये टाकला, अखंड बडबड करणाऱ्या मुलाला शिक्षकांनी आपल्या डेस्कजवळ खुर्चीत बसवलं.. हे सगळे प्रकार जाहीररीत्या अवहेलनेचेच आहेत. शाळेचं ड्रेसकोड मोडलं तर शाळा मुलांना शिक्षा करतात. मुलं (पालक) शाळेला या शिक्षेविरुद्ध कायद्याच्या कचाटय़ात पकडू शकतात. मिरांडा नावाची मुलगी हायस्कूलमध्ये नवीन विद्यार्थिनी म्हणून दाखल झाली होती. तिसऱ्याच दिवशी तिला एका शिक्षकाने लांबून पाहिलं. तिच्या स्कर्टची लांबी शाळेत परवानगी असलेल्या लांबीपेक्षा एक-दोन इंचाने कमी होती. तिला शाळेने लाल रंगाच्या स्वेट पँट्स आणि पिवळा टी-शर्ट घालायला लावला. त्या शर्ट आणि पँटवर ‘ड्रेसकोड व्हायोलेशन’ असं मोठय़ा अक्षरात लिहिलं होतं. तिची आई त्याला ‘शेम सूट’ म्हणते. १४-१५ वर्षांच्या मिरांडाला हा सगळा प्रकार अतिशय शरमेचा वाटला. तिच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे मुलीने जी चूक केली त्याचं जाहीर प्रदर्शन करून शाळेने तिच्या खासगी हक्काचं उल्लंघन केलं आहे आणि तिला जाहीर अवहेलनेची बळी केलं आहे. तिची आई शाळेला आता कोर्टात खेचणार आहे.

या शिक्षेला समाजात मान्यता नाही. किंबहुना विरोधच आहे. पण शालेय व्यवस्थेत यास वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. ११-१२ वर्षांच्या शालेय शिक्षणाच्या काळात सगळेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनाला जपणारे असतील असं नाही. शाळा-कॉलेजचं शिक्षण पुरं झाल्यावर या विद्यार्थ्यांनी कधी मागे वळून पाहिलं तर ही वषेर्ं सुखद आणि कमी सुखद आठवणींनी भरलेली असतात. या साऱ्या आठवणी मुलांच्या मोठं होण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग असतात. मुलांना लाज वाटेल अशी शिक्षा न करता शिस्त लावणं, शिकवणं आणि घडवणं ही तारेवरची कसरत करण्यासाठी अमेरिकेत बरेच पालक आणि शिक्षक कटिबद्ध होताना दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

– शशिकला लेले
naupada@yahoo.com            

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2015 12:40 am

Web Title: article on in america public shaming
Next Stories
1 कॉफी आणि बरंच काही..
2 तिसऱ्या जगातील नागरिकांच्या समस्या
3 कोलंबस आणि अमेरिका
Just Now!
X