पाणी म्हणजे जल आणि जल म्हणजे जीवन. पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण- पाणी असेल, तरच ही जीवसृष्टी अस्तित्वात राहणार आहे; अन्यथा नाही. पाणी हे सर्व सजीवांसाठी अत्यावश्यक असूनही मानव त्याचा वापर इतरही अनेक वायफळ कारणांसाठी करतो आहे; जी एक चिंताजनक बाब आहे. पण, जेव्हा जेव्हा एखाद्या नदी किंवा तलावाबद्दल चर्चा होते, तेव्हा तेव्हा लोक विशेषत्वाने त्यातील पाण्याच्या स्वच्छतेबद्दल नक्कीच बोलतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर जगातील सर्वांत स्वच्छ पाणी कुठे बरे मिळत असेल, हा प्रश्न स्वाभाविकच मनात आल्याशिवाय राहत नाही. तोच तुमचा प्रश्न लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अशा एका तलावाबद्दलची माहिती देणार आहोत; ज्या तलावातील पाणी सर्वांत स्वच्छ आहे. तेथील पाणी इतके स्वच्छ अन् पारदर्शक आहे की, ते पाणी आहे की काच हेच लवकर कळत नाही.

‘या’ तलावाचे पाणी जगामध्ये सर्वांत स्वच्छ!

न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर असलेले ‘ब्ल्यू लेक’ हे जगातील सर्वांत स्वच्छ पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. या तलावाचे पाणी इतके स्वच्छ आहे की, ते पाणी आहे की काच हे ओळखणेच कठीण होते. ‘ब्ल्यू लेक’ तलाव समुद्रसपाटीपासून १,२०० मीटर उंचीवर वसलेला आहे. २०११ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अॅण्ड ॲटमॉस्फेरिक रिसर्च’च्या शास्त्रज्ञांनी ‘ब्ल्यू लेक’चे पृथ्वीवरील पाण्याचा सर्वांत स्वच्छ नैसर्गिक स्रोत म्हणून वर्णन केले आहे. अभ्यासानुसार, ७० ते ८० मीटर अंतरावरूनही तुम्हाला या तलावाच्या आतील दृश्य अगदी स्पष्टपणे पाहता येते. असे म्हणतात की, या तलावाच्या तळाशी पडलेले छोटे खडे आणि दगडदेखील स्पष्टपणे दिसतात.

(हे ही वाचा : ‘हे’ आहे भारतातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक; वाचताना तुम्हीही अडखळाल, एकदा प्रयत्न करुन पाहाच! )

या तलावाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे. येथील पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी या तलावात पोहण्याचे सोडाच; पण पाण्याला स्पर्श करण्यासही बंदी आहे. त्याशिवाय माओरी लोकांसाठी या तलावाचे खूप आध्यात्मिक महत्त्व आहे आणि त्यांच्यासाठी तो आदरणीय आहे. येथील स्थानिक माओरी लोक या तलावाला पवित्र मानतात. त्यामुळे त्याला स्पर्श करण्यासही मनाई आहे.