आत्तापर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल की करोना प्रतिबंधक लस दंडात दिली जाते. बऱ्याचश्या लसी या स्नायूंमध्ये दिल्या जातात. त्यांना इन्ट्रामस्क्युलर इंजेक्शन असं म्हणतात. तर पोलिओसारख्या काही लसींचे डोस तोंडावाटेही दिले जातात. काय कारण आहे लस दंडात देण्याचं? करोना लसीचा डोस दंडातच का दिला जातो? जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

स्नायूंचं महत्त्व काय?

बऱ्याचश्या लसी ह्या दंडाच्या किंवा मांडीच्या स्नायूंमध्ये दिल्या जातात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्याची लसीची क्षमता अधिक अनुकूल असते. त्याचबरोबर ज्या जागी इंजेक्शन दिलं आहे, तिथे त्रास होण्याची शक्यता कमी होते. करोना प्रतिबंधाच्या लसी ह्या दंडाच्या स्नायूंमध्ये देण्यासाठीच तयार कऱण्यात आल्या आहेत. तिथे लस दिल्याने त्रास कमी होतो आणि इतर भागांच्या तुलनेत वेदनाही कमी होतात.

या लसी कशा काम करतात?

जेव्हा लस दंडाच्या किंवा मांडीच्या स्नायूमध्ये दिली जाते, तेव्हा ती लस दंडामधून शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी लिम्फ नोड्समध्ये जातात. तिथे त्यांना पांढऱ्या रक्त पेशी, टी पेशी आणि बी पेशी आढळतात. या पेशी रोगजंतूंपासून शरीराचं रक्षण करत असतात. या पेशींकडे आपल्याकडची माहिती जाते आणि त्यानंतर या पेशी प्रतिपिंडे किंवा अँटिबॉडी तयार करतात आणि कमी कालावधीतच त्या पेशी मोठ्या प्रमाणात रोगजंतूंच्या प्रतिकार करण्यासाठी गुणाकार पद्धतीने अँटिबॉडी तयार करतात.

स्नायूंमध्ये प्रतिकारक्षमता असलेल्या पेशी असतात..

लस प्रभावी ठरण्यासाठी स्नायूंमध्ये रोगप्रतिकारक पेशी असतात. तिथले काही घटक ही लस हळुवारपणे किंवा कमी वेगाने शरीरात इतरत्र पाठवतात. त्यामुळे लस दिल्यानंतर त्याची शरीरावर उमटणारी प्रतिक्रिया म्हणजे साईड इफेक्ट्सची तीव्रता कमी होते. लस जर थेट रक्तामध्ये दिली तर रक्तातली काही प्रोटीन्स आणि एन्झाईम्स लसींमधल्या घटकांवर आक्रमण करतात आणि त्यामुळे लसीची क्षमता कमी होते आणि तिचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून ही लस दंडातच दिली जाते.