काळानुरुप आपली जीवनशैली जशी बदलत चालली आहे. तसे नातेसंबंधामधील पद्धतीही बदलत चालल्या आहेत. विशेष करून शहरात एकट्याने राहणाऱ्या जोडप्यांमधील नातेसंबंध गुंतागुंतीचे झाल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. सध्या सोशल मीडियावर स्लीप डिव्होर्स हा हॅशटॅग चांगलाच सर्च होत आहे. अनेकजण या विषयाबाबत जाणून घेण्यास इच्छुक आहेत. तर ज्यानी स्लीप डिव्होर्स अमलात आणला, ते याचे फायदे-तोटे सोशल मीडियावर कथन करत आहेत. रात्री जोडीदारापासून वेगळे झोपणे याचे काही फायदे-तोटे आहेत. प्रत्येक नात्यातील वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्याचा अनुभव येतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, स्लीप डिव्होर्स घेणे म्हणजेच रात्री जोडीदारापासून वेगळे झोपण्यामुळे झोपेचा दर्जा वाढतो. तर याचे काही तोटेही आहेत. जसे की, जोडीदारापैकी कुणाही एकाची यास सहमती नसेल तर नातेसंबंधात तणाव, दुरावा निर्माण होऊ शकतो. लैंगिक जवळीक कमी होऊ शकते.
चांगल्या झोपेसाठी स्लीप डिव्होर्स पर्याय होऊ शकतो?
रात्री झोपताना एखाद्याला आवाजामुळे त्रास होत असेल आणि जोडीदारापैकी कुणी जर घोरत असेल तर दुसऱ्याच्या झोपेवर परिणाम होतो. अशावेळी एका जोडीदाराची झोप अपुरी राहिल्यास त्याचे परिणाम दुसऱ्या जोडीदारावरही होतात. काहींना एसीच्या तापमानाची चिंता असते, काहींना पंखा किंवा बेडवरील गादीची अडचण असते. तर काहींना विशिष्ट पद्धतीत हात-पाय पसरून झोपण्याची सवय असते. या समस्यांवर मात करण्यासाठी आपल्या जोडीदारापासून वेगळे होऊन वेगळ्या बेडवर झोपण्याचा पर्याय झोपेच्या गुणवत्तेसाठी लाभदायक ठरू शकतो.
गेटवे ऑफ हिलिंग या संस्थेच्या संस्थापक आणि संचालक डॉ. चांदणी तुग्नैत यांनी हिंदुस्तान टाइम्सला बातमी देताना सांगितले की, झोप पूर्ण न झाल्यास त्याचे विपरित परिणाम दोघांवरही होतात. जोडीदारातील एकामुळे जर दुसऱ्याची झोपमोड होत असेल तर त्यांच्यातील भावनिक बंध कमी कमी होऊ लागतात. झोपेच्या समस्यांशी जे झगडत आहेत, त्यांच्यासाठी वेगळं झोपणं वरदान ठरू शकतं. हा एक व्यावहारिक उपाय आहे.
स्लीप डिव्होर्सचे लाभ काय आहेत?
डॉ. चांदणी यांच्यामते स्लीप डिव्होर्समुळे झोपेच्या अडचणींवर काही प्रमाणात मात करता येते. जर जोडप्याची झोप व्यवस्थित पूर्ण झाली तर त्यांचे मानसिक स्वास्थ सुधारते, शारीरिक आजारही दूर ठेवण्यास मदत होते. जेणेकरून नात्यामधील भावनिक संबंध टीकून राहतात.
स्लीप डिव्होर्सचे तोटे काय आहेत?
एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात, तसे काही तोटेही असतात. त्याप्रमाणेच स्लीप डिव्होर्सचेही आहे. यामुले लैंगिक जवळीकता कमी होते तसेच भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच धकाधकीच्या जीवनामुळे रात्रीचा जो वेळ एकमेकांसह घालविण्याची संधी असते, तीही यामुळे मिळू शकत नाही. भावनिक दुरावा, एकमेकांपासून दूर झोपल्यामुळे जोडीदाराच्या मनात नाकारले जाण्याची भावना निर्माण होऊ शकते, एकमेकांशी संवाद साधण्याची संधी गमावली जाते, लैंगिक जीवनावर परिणाम आणि कुटुंबावरही त्याचे परिणाम जाणवू शकतात.