आपण गाडी चालवतो म्हणजे काय करतो, तर गरजेनुसार स्टीअरिंग फिरवतो, गीअर बदलतो, ब्रेक लावतो वगरे वगरे.. चालकाने या सर्व गोष्टींचे भान राखल्यानंतरच गाडी व्यवस्थित चालते. मात्र गाडीतील सर्व स्पेअर पार्ट्स त्यांच्या त्यांच्या जागी फिट्ट बसले असतील तरच हे सर्व शक्य होते, नाही का? तर हे सर्व कुठे शक्य होते.. अर्थातच गाडी जिथे तयार होते त्या कारखान्यात.. तर अशाच एका कारखान्याला भेट देण्याचा योग नुकताच आला.. राजस्थानातील तापुकारा येथील होंडा कार्सच्या प्लँटची ही आँखो देखी..

दिल्लीचं तापमान ४४ डिग्री सेल्सिअस.. बरं तिथे काही हवेत आद्र्रता वगरे नाही, त्यामुळे थेट अंगात मुरणारं हे ऊन. त्यामुळे उन्हाचा तडाखा जरा कमी बसावा असे वाटत असेल तर सकाळी लवकर निघणे ओघाने आलेच. आम्ही तेच केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांना घेऊन जाणारी बस हॉटेल लॉबीत तयार होती. सकाळी आठच्या मुहूर्तावर आमची बस दिल्ली एनसीआरच्या (राजधानी दिल्लीचा विस्तारित परिसर) दिशेने निघाली. गुडगाव मागे पडल्यानंतर जयपूर, अलवर अमूक किमी अंतरावर वगरे मलाचे दगड दिसू लागले. अर्थातच आमचे गंतव्य स्थान राजस्थानातीलच भिवाडी औद्योगिक परिसरातील तापुकारा हेच होते. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही तापुकाऱ्याला पोहोचलो. तोपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवायला लागला होताच.. पण आम्हा सर्वाना उत्सुकता होती ती म्हणजे नेमकी कार बनते कशी हे पाहणे. समोर होता होंडा कार्सचा विस्तीर्ण भूखंडावर, तब्बल ४५० एकर पसरलेला कारखाना.. इथेच होंडाची अमेझ ही सेडान तयार होते. गेल्या फेब्रुवारीपासून अमेझचे उत्पादन या ठिकाणावरून सुरू झाले. तसा उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथेही होंडाचा प्लांट आहे. मात्र होंडा सिटी, अमेझ यांच्याबरोबरच जॅझ व ब्रायोची मागणी वाढत असल्याने होंडा व्यवस्थापनाने तापुकाऱ्याचा प्लँट सुरू केला आहे.

असेम्ब्ली फ्रेिमग
आगतस्वागतानंतर आम्हाला सर्वप्रथम नेण्यात आले ते फ्रेिमग विभागात.. गाडीच्या प्रत्येक भागाची जुळणी कशी केली जाते, याची सविस्तर माहिती आम्हाला येथे देण्यात आली. गाडी अंतर्बाह्य़ कशी बनते याचीच ती चुणूक होती. आधी नुसता सांगाडा असलेल्या गाडीत स्टीअिरग व्हील बसवणे, गीअर्स, ब्रेक, हँडब्रेक, सीट्स, अंतर्गत गॅजेट्स यांची तयारी, जुळवाजुळव हे सर्व अगदी जवळून निरखून पाहता आले. मोठमोठी मशिन्स, त्यावर शिस्तबद्धरीत्या काम करणारे कर्मचारी इ. इ. याच ठिकाणी गाडी पूर्ण तयार होऊन देशभरातील होंडा डीलर्सकडे जाण्यासाठी रोल आऊट होते.

वेल्डिंग
गाडीत आपण पाय रोवून बसतो. अर्थात त्यासाठी खालचे फ्लोअरिंग पक्के लागते. त्याचीच जुळणी या विभागात केली जाते. शिवाय गाडीचे दार, मागील डिकी, पुढील बोनेट यांचीही जुळणी वेल्डिंग विभागात केली जाते. वेल्डिंग विभाग हा गाडीचा सांगाडा तयार करण्यातील एक महत्त्वाचा भाग समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी होणारे काम वेल्डिंगचे असल्याने आम्हा सर्वाना सक्तीने डोळ्यांना चष्मा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या वेल्डिंग विभागात रोबोटिक मशिन्सही पाहायला मिळाले. गाडीच्या फ्लोअरिंगच्या कामात या मशिन्सचा मोठा वाटा असतो. प्रत्येक फ्लोअरिंगचे फिक्चर्स नीट करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवणे हे या मशिन्सचे काम. येथेच गाडीचा सांगाडा तयार होऊन तो पुढे असेम्ब्ली फ्रेमिंग विभागाकडे पाठवला जातो. पुढे मग तिचे कलिरग व फिनिशिंग टचचे काम इतर विभागांत केले जाते.

पॉवरट्रेन
गाडीच्या इंजिनातील महत्त्वाचे भाग, कनेक्टिंग रॉड्स, शाफ्ट्स, शॉक एॅब्झॉर्बर्स यांची निर्मिती या विभागात केली जाते. या भागांमुळेच गाडीला ऊर्जा आणि गती निर्माण होते, त्यामुळे कारनिर्मितीतील हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कनेिक्टग रॉड्स तयार करण्यासाठी मोठमोठय़ा लोहभट्टय़ा येथे उभारण्यात आल्या आहेत. येथे एका शिफ्टमध्ये काम सुरू असते. आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी या ठिकाणी घेण्यात येते. जागोजागी सुरक्षाविषयक सूचना येथे वाचायला मिळतात. शिवाय गाडीची निर्मिती झाल्यानंतर तिची चाचणी घेण्यासाठी एक ट्रॅकही येथे तयार करण्यात आला आहे.

दरवर्षी एक लाख २० हजार
फेब्रुवारीपासून तापुकारा प्लँटचे काम सुरू झाले आहे. या प्लँटमधून दरवर्षी एक लाख २० हजार गाडय़ांची निर्मिती करण्याचे होंडा व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. मात्र या ठिकाणी सध्या तरी फक्त होंडा अमेझचेच उत्पादन केले जाणार आहे. ग्रेटर नोएडा येथील प्लँटमध्येही दरवर्षी एक लाख २० हजार गाडय़ा उत्पादित होतात. तापुकारा प्लँटमध्ये सद्यस्थितीत सिंगल शिफ्टमध्येच काम चालते.

३२०० कर्मचारी
साडेतीन हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या या प्लँटमध्ये एकूण ३२०० कर्मचारी आहेत. त्यात २०४७ कर्मचारी स्थानिक असून, सर्व जण आयटीआय पदविकाधारक आहेत. प्लँटमध्ये निर्मिती प्रक्रिया सुरू केल्याने येथील स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळाल्याचे होंडाचे म्हणणे आहे. प्लँटमधून रोल आऊट होणाऱ्या सर्व गाडय़ा १०० टक्के दोषमुक्त असल्याचे होंडा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. कठोर परीक्षण केल्यानंतरच या ठिकाणाहून गाडय़ा रोल आऊट होत असल्याचे कंपनी म्हणते. गाडी निर्मिती प्रक्रिया पाहण्याचा हा अनुभव एकूणच ‘अमेिझग’ होता.