महिन्द्र टू व्हीलर्सने वर्षांच्या सुरुवातीलाच दोन नव्या मोटारसायकली भारतीय ग्राहकांसाठी बाजारात उतरविल्या आहेत.  पंटेरो व सेंच्युरो अशी या दोन नव्या मोटारसायकलींची नावे असून नुकतेच या दोन नव्या मोटारसायकलींचे प्रत्यक्ष विक्रीपूर्व अनावरण करण्यात आले. या मोटारसायकली ११० सी. सी. इतक्या क्षमतेच्या असून त्यामध्ये स्वदेशी विकसित केलेले मायक्रो चिप इग्लायटेड ५ कव्‍‌र्ह इंजिन, इंजिन इम्मोबिलायझरसहीत सेंट्रल लॉकिंग अँटि थेप्ट सिस्टिम, रिमोट १२८ बिट एन्स्क्रीप्टेड फ्लीप की, फाइंड मी लॅम्प्स, अशा नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत.
मायक्रो चिप इग्लायटेड ५ कव्‍‌र्ह इंजिन इंधन बचतीच्यादृष्टीने संशोधित करण्यात आले आहे.महिन्द्रच्या इंदूरजवळच्या पिठमपूर प्रकल्पात या हे इंजिन तयार केले आहे. पुण्यातील महिन्द्रच्या संशोधन केंद्रात १८ महिन्यात त्यांचे आरेखन करण्यात आले आहे.
सेंट्रल लॉकिंगमुळे चोरांपासून संरक्षण करण्याची सुविधा मिळते तर गर्दीमधील पार्किंग जागेतून तुमची मोटारसायकल नेमकी कुठे आहे ते समजून येण्यासाठी फाइंड मी लॅम्प्स, देण्यात आले आहेत. पार्किंगमध्ये तुम्ही मोटारसायकल उभी केल्यानंतर तिचे दिवे चकाकत राहातील. त्यामुळे तुम्हाला तुमची मोटारसायकल पार्किंगमधून शोधण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही.
१०६.७ सीसी इंजिन असणाऱ्या मोटारसायकलींना ८.५ पीएस व ७५०० आरपीएम इतकी ताकद आहे तर ८.५ एनएम व ५५०० आरपीएम इतका टॉर्क देण्यात आला आहे. सेंच्युरोला १७३ मिमि इतका व पंटेरोला १६५ मिमि इतका ग्राऊंड क्रीअरन्स देण्यात आला आहे. सेंच्युरोमध्ये सव्‍‌र्हिस डय़ू इंडिकेटर, डिस्टन्स टू एम्प्टी फ्युएल कॅल्क्युलेटर असणारा डिजिटल डॅशबोर्ड देण्यात आला आहे.
या दोन्ही मोटारसायकली प्रति लीटर पेट्रोलला ७९.५ किलोमीटर इतके मायलेज देतील, असा कंपनीचा दावा आहे. सध्याच्या ११० सीसी मोटारसायकलींना या दोन्ही मोटारसायकली पर्याय ठरू शकतील. आसन ८०० मिमि उंचीवर असून १२६५ इतका व्हीलबेस देण्यात आला आहे. आकर्षक ग्राफिक्स, स्टायलीश दिसणे व डिजिटल डॅशबोर्ड अशा विविध गुणांनी मोटारसायकल सजविली आहे. नव्या वर्षांतील मोटारसायकलींमधील हे पहिलेच पदार्पण महिन्द्र टू व्हीलरने साधले आहे. मात्र अद्याप या मोटारसायकलींच्या किंमतीबद्दल काहीच घोषित करण्यात न आल्याने ग्राहकांची उत्सुकता मात्र ताणून धरली आहे.