मर्सिडीज बेन्झने सर्वाधिक खपाची जीएलई ही जी क्लासमधील लक्झरी एसयूव्ही नव्या स्वरूपात सादर केली आहे. नऊ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या एसयूव्हीमध्ये चालकाला कम्फर्ट, स्पोर्ट, स्लिपरी, ऑफ रोड व वैयक्तिक अशा स्वरूपातील पर्याय उपलब्ध असतील. त्याचबरोबर अटेन्शन असिस्ट, अ‍ॅक्टिव्ह पार्किंग असिस्ट, कव्‍‌र्ह डायनामिक असिस्ट, क्रॉसविंड असिस्ट या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सोयीही या गाडीत आहे. जीएलई २५० डी व ३५० डी या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे ५९ व ७० लाख (एक्स शोरूम किंमत) रुपये इतकी आहे.

फियाट क्रायस्लरने अबार्थ पुण्टो ही नवीन हॅचबॅक नुकतीच बाजारात आणली आहे. प्रचंड ताकदीचे इंजिन हे या गाडीचे वैशिष्टय़ आहे. अवघ्या ८.८ सेकंदात अबार्थ १०० किमी प्रतितास एवढा उच्च वेग गाठू शकते. दहा सेकंदांची मर्यादा मोडणारी ही देशातली पहिली हॅचबॅक ठरली आहे. इलेक्ट्रिक बूट ओपन, ऑटोमॅटिक एसी, मागील बाजूस एसी व्हेंट, फोल्डेबल चाव्या व फॉलो मी हेडलॅम्प्स ही या गाडीची आणखी काही वैशिष्टय़े आहेत. लाल, काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या या गाडीची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे.