मोटारीचे सौंदर्य जसे तिच्या आकारावरून व आरेखनावरून घडविले जाते तसेच अगदी चांगल्या, देखण्या मोटारीचे सौंदर्य अंतर्गत रचनेच्या नीटनेटकेपणावरून ठरते. जसे वस्त्रांवरून माणसाची परीक्षा होते असे म्हणतात, तसेच मोटारीतील आसनांच्या दिसण्यातून त्या मोटार मालकाच्या सौंदर्यदृष्टीची, कलात्मकतेची आणि नीटनेटकेपणाचीही परीक्षा होत असते.
प्रवासी मोटारींमध्ये वैयक्तिक वापराच्या मोटारी अधिकाधिक देखणेपणाने ठेवल्या जातात. त्यावर जीव जडवणारीही अनेक माणसे असतात. मोटारीला बाहेरून असणारा रंग, रंगसंती व ती अधिक चांगली दिसावी म्हमून जसे पॉलिश केले जाते, दैनंदिन स्वरूपात धुणे-पुसणे केले जाते. मुळात आपली मोटार छान दिसावी व त्या छान व नीटनेटकेपणाचा आनंद आपल्याबरोबर, घरच्यांना, आत बसणाऱ्या प्रवाशांनाही घेता यावा यासाठी कटाक्षाने काही काम केले जाते. मोटारीतील आसनांवर असणाऱ्या फोमची प्रत, त्यावरील रंगसंगतीचे कव्हर. त्या कव्हराची विविधांगी प्रत अगदी निवडकपणे पाहाणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. स्वत:चा प्रवास आनंदमयी व स्वच्छ वातावरणात व्हावा यासाठी सीटकव्हर्सची रचना ही महत्त्वाची ठरते.
भारतात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या मोटारी म्हणजे हॅचबॅक, सेदान व बहुपयोगी अशा श्रेणीतील मोटारी. अतिलांब मोटारी परदेशी चित्रपटांमध्ये पाहावयास मिळतात. बेडरूम, किचन अशा सोयीसुविधा असणाऱ्या मोठय़ा खास बनावटीच्य कारव्हॅनही परदेशात वापरल्या जातात. भारतात तितका वापर त्या मोटारींचा होत नाही. अशा मोटारींमध्ये असणारी सुविधा ही अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये असणाऱ्या खोल्यांसारखी असते.
थोडक्यात मोटारीमध्ये असणारे अंतर्गत रूप हे स्वच्छ नीटनेटके, सौंदर्यपूर्ण व रंगसंगती राखणारे असावे असे भान त्यामागे ठेवले जाते.  भारतात वैयक्तिक स्वरूपात वा प्रवासी वापरासाठी असणाऱ्या या मोटारींच्या बाह्य़सौंदर्याबरोबरच आसनव्यवस्था अधिक छान वाटावी म्हणून आसनांना लेदर (कृत्रिम), कापडी (आसनी अभ्रे) कव्हर्स मोटारीच्या रंगसंगतीचे भान ठेवणारे अनेक मोटारमालक दिसतात. वैयक्तिक वापराच्या खासगी प्रवासी वाहनांपासून ते टॅक्सी वा पर्यटनासाठी वाहनांपर्यंत आसनांना महत्त्व दिले जाते.
मोटारीतील अंतर्गत रचनेत आसनांना उत्पादक कंपनीकडून कापडी, कापूस, नायलॉन, सिंथेटिक कापड वा फोम लेदर, इटालियन लेदर, यांचा पूर्ण वा संमिश्र वापर करून तयार केले जाते. आसनाच्या आतील भागात पूर्वी स्प्रिंग्ज, काथ्या यांचा वापर केला जात असे आता मात्र फोमचा वापर अधिक केला जातो. हे करीत असताना आसनाला मऊपणा येण्यासाठी त्यात टाकलेल्या या कच्चा मालावर कंपन्यांकडून दिली जाणारे हे आसनअभऱ्याचा थर हा पहिला थर असतो. अनेक जण तो मूळ थर कायम ठेवून त्यावर अन्य कव्हर आवडीप्रमाणे टाकून घेतात. जे कव्हर हे पूर्ण शिवलेले नसते. ते आच्छादन स्वरूपात दोऱ्यांनी व हुकांनी आसनाच्या सांगाडय़ाला बांधले जाते. मऊ कापसाची (टर्किश टॉवेलसारख्या कापडाची) कव्हर्सही मोटारींमध्ये टाकली जातात. जी कव्हर्स धुण्यासाठी सहज सोपी असतात. सर्वसाधारणपणे कापडी वा सिंथेटिक कापडांमध्ये तयार केलेली ही आच्छादनात्मक कव्हरांची निर्मिती करतानाही त्याच स्पंजचा वापर केला जातो. मळखाऊ रंग असणे हे अधिक पसंत केले जाते.
फोम लेदर वा इटालियन लेदरसारख्या वेगळ्या स्वरूपाची आच्छादनेही आसनांना वेगळेच सौंदर्य व टिकाऊपणा देणारी आहेत. त्यात एकाच रंगाचा वा दोन-तीन रंगाचाही संमिश्र वापर केला जातो. आसनांची ही आच्छादने बनविताना मोटारीचा रंग, आतील रंगसंगती विचारात घेतली जाते.
कृत्रिम लेदरचा वापर प्रामुख्याने सेदानमध्ये, उच्चश्रेणीतील मोटारींमध्ये केला जातो. फक्त कापडी (टर्किश ) वा सिंथेटिक कापडाचा वापर करून तयार होणारी कव्हर्सही प्रामुख्याने छोटय़ा मोटारींमध्ये वापरली जातात. मूळ उत्पादक कंपनीने दिलेल्या आसनांनावर कव्हर्स हमखास ९९ टक्के लोक टाकतात. त्यामुळे आसनावरील मूळ वस्त्राला खराब होण्यापासून रोखले जाते. भारतातील विविध भागामध्ये असलेली हवामानाची स्थिती लक्षात घेऊन वा मोटारीचा वापर कुठे होणार आहे, ही बाब लक्षात घेऊन ही कव्हर्स टाकावीत.
वातानुकुलीत यंत्रणा सातत्याने वापरणाऱ्यांना फोम लेदरची कव्हर्स वापरणे चालू शकते. मात्र उष्णता अधिक असणाऱ्या या भारतीय प्रदेशात जर वातानुतुलीत यंत्रणाोर वापरणार नसाल तर अशा आसनांवरील गरमपणा त्रासदायी ठरतो. कापडी वा सिंथेटिक आच्छादनामध्ये एक प्रकारचा मऊशारपणा असला तरी काही कापडांची विण ही त्रासदायी ठरणारी असते. त्यात असणारा कडकपणा हा खरखरीत स्पर्शाने कटकटीचा वाटतो. पावसामध्ये अशा प्रकारची आच्छादने जपावी लागतात. त्यामुळे पावसाळी हंगामात फोम लेदरची कव्हर्स सुटसुटीत ठरतात.  धुळीच्या वातावरणातही ती चांगली मानली जातात. त्यावरील धूळ साफ करणे सोपे असते. कापडी वा सिंथेटिक कापडाद्वारे तयार केलेल्या आसनांवरील आच्छादनांना पावसात व धुळीच्या प्रदेशातील प्रवासात जपणे तसे त्रासदायी असते.
एकूण ही आच्छादने मोटारीत कोणत्या प्रकारची लावायची तो ज्याचा त्याचा आवडीचा, रंगसंगतीनुसार व किंमतीनुसार वापरण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. तो वेगळा असला तरी आसनांना मिळणारे हे आच्छादन कापडाचे वा लेदरचे सौंदर्य मोटारीबरोबरच देखभालीसाठीही सुटसुटीत आहे का, वातावरणाच्या दृष्टिने उपयुक्त आहे का, तुमच्याबरोबर मोटार वापरणाऱ्या तुमच्या कुटुंबियांनाही ते सुखकारक ठरणारे आहे का, त्याचाही जरूर विचार करावा. केवळ छान दिसते, पॉश वाटते म्हणून ही आच्छादने आसनांवर टाकू नयेत हे नक्की!