सुरक्षित प्रवासाचा मूलमंत्र काय आहे.. याचं उत्तर अगदी सहज आणि सोप्पं आहे आणि ते म्हणजे सुरक्षित ड्रायिव्हग. बेदरकारपणे गाडी चालवली तर १०० टक्के अपघाताची शक्यता असते, हे सांगायला तज्ज्ञाची किंवा गेला बाजार भविष्यवेत्त्याची गरज मुळीच नाही. आताशा अनेक ऑटो कंपन्यांनी ग्राहकहितासाठी सुरक्षित ड्रायिव्हगसाठी शिकवण्या सुरू केल्या आहेत. नाहीच तर सुरक्षित ड्रायिव्हगवर सप्ताह तरी आयोजित केला जातो किंवा जनजागरण मोहीम तरी या कंपन्यांकडून राबवली जाते. याच पाश्र्वभूमीवर मारुतीही आता सुरक्षित ड्रायिव्हगसाठी एक स्पर्धाच आयोजित केली आहे.
बेफाम गाडी चालवण्याचे प्रकार विशेषत तरुणांकडूनच घडतात. त्यातून मग अपघात होतात. हे टाळण्यासाठी आणि तरुणांमध्ये सुरक्षित ड्रायिव्हगबरोबरच गाडीची काळजी कशी घ्यावी वगरेची जागृती व्हावी यासाठी मारुती सुझुकीतर्फे ‘यंग ड्रायव्हर २०१३’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ४४ शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाईल. १८ ते ३० या वयोगटातील मुले-मुली या स्पध्रेत भाग घेऊ शकणार आहेत. विजेत्याला मारुती अल्टो-८०० बक्षीस म्हणून तर दिली जाणार आहेच शिवाय वर्षभर हा विजेता सुरक्षित ड्रायिव्हगसाठी मारुतीतर्फे चालवण्यात येणा-या अभियानाचा ब्रॅण्ड एॅम्बॅसिडरही ठरणार आहे.

स्पध्रेचे स्वरूप आणि टप्पे
*  पहिला टप्पा
स्पध्रेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी http://www.youngdriver.in    या वेबसाइटवर किंवा facebook.com  च्या माध्यमातून प्रश्नावलीच्या स्वरुपातील थिअरी चाचणी उत्तीर्ण व्हावी. स्पध्रेचा हा पहिला टप्पा २८ जूनपर्यंत खुला राहील.
*  दुसरा टप्पा
पहिल्या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची देशभरातील ४४ शहरांमधून स्कील टेस्ट (क्षमता चाचणी) घेतली जाईल. ४ ते २८ जुल या कालावधीत हा दुसरा टप्पा पार पडेल.
*  तिसरा टप्पा
या दोन्ही टप्प्यातून २० उमेदवारांची निवड केली जाईल. दिल्लीत होणा-या महाअंतिम फेरीसाठी त्यांना त्या ठिकाणी नेण्यात येईल. सुरक्षा, वाहन नियंत्रण, थिअरी ज्ञान आणि ड्रायिव्हग करताना त्याचा वापर अशा विविध २० मापकांच्या आधारे उमेदवाराची चाचणी या महाअंतिम फेरीत घेतली जाईल.
*  चौथा टप्पा
या स्पध्रेचा विजेता ठरलेल्या उमेदवाराला ‘मारुती सुझुकी-ऑटोकार यंग ड्रायव्हर ऑफ द इयर २०१३’ हा किताब देण्यात येईल. तसेच वर्षभर हा विजेता मारुतीतर्फे चालवण्यात येणाऱ्या सुरक्षित ड्रायिव्हगवरील अभियानाचा ब्रॅण्ड एॅम्बॅसिडर राहील. आणि नवीकोरी मारूती अल्टो-८०० ही गाडीही त्याला बक्षीस मिळणार आहे. तेव्हा चला लागा तयारीला.