रखरखीत पितृपक्ष संपून नवरात्रीचा गजर सुरू झाला आहे. परतीच्या पावसानेही जाता जाता कृपावृष्टी केली आहे. दिवाळीनंतर सुगीचा हंगाम सुरू होणार आहे. असे सर्वत्र फील गुड वातावरण असतानाच गेल्या काही महिन्यांपासून आíथक मंदीच्या लाटेत गटांगळ्या खात असलेल्या वाहन उद्योगालाही सणासुदीच्या दिवसांत जरा तरतरी आल्याचे चित्र आहे. मारुतीच्या गाडय़ांचा खप वाढल्याचे आकडे आले आहेत. होंडानेही गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी नोंदवली आहे. एकूणच नवरात्र-दसरा आणि महिनाअखेरीस आलेली दिवाळी या सगळ्यामुळे ऑक्टोबर महिना वाहन उद्योगाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने हिट झाला आहे..
सप्टेंबर अखेरीस रिझव्‍‌र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर रघुराम राजन यांनी तिमाहीतील पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात अर्थातच गृह आणि वाहन कर्जे महागण्याचे संकेत देण्यात आले. सर्वसामान्यांना दिलासा देणारे पतधोरण जाहीर करत रघुराम राजन पहिल्याच प्रयत्नात फेसबुक लाइक्स कमावतील अशी भल्याभल्यांची आशा त्यामुळे फोल ठरली. मात्र, तरीही गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर वाहन उद्योगासाठी हा फेस्टिव्ह सीझन नशीबवान ठरला आहे. म्हणजे असे की गेल्याच आठवडय़ात मारुतीने त्यांच्या गाडय़ांच्या विक्रीत वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षांच्या तुलनेत सप्टेंबरात मारुतीच्या एक लाख चार हजार ९६४ गाडय़ांची विक्री झाली. सप्टेंबर-२०१२ मध्ये विक्रीचा हा आकडा ९३ हजार ९८८ एवढा होता. त्यामुळे अर्थातच मारुतीने प्रतिकूल परिस्थितीत
चांगली कामगिरी नोंदवल्याचे स्पष्ट होते. रुपयाच्या वाढत्या घसरणीमुळे आपल्या सर्व वाहनांवर सरसकट दहा हजार रुपयांची वाढही मारुतीने महिन्याच्या सुरुवातीला केली. अशीच घोषणा त्यांनी यंदाच्या वर्षांच्या सुरुवातीलाही केली होती. असे असूनही मारुतीच्या अल्टो, िस्टग रे, वॅन आर व एर्टगिा या गाडय़ांची मागणी वाढत आहे.
होंडानेही गेल्या महिन्यात विक्रीचा नवा उच्चांक गाठला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरात होंडाने दहा हजार ३५४ कार्सची विक्री केली आहे. मात्र, सर्वच कार कंपन्यांचा विक्रीचा आलेख चढताच राहिला असे नाही. ह्युंदाईच्या विक्रीत मागील वर्षांपेक्षा घट झाली. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ह्युंदाईच्या ५३ हजार ५५७ गाडय़ांची विक्री झाली होती. यंदा मात्र ती ५१ हजार ४१८ एवढी झाली. जनरल मोटर्सच्या विक्रीतही घट नोंदवण्यात आली.
दुचाकीच्या विक्रीत टीव्हीएसने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ हीरो मोटर्स आणि होंडा यांचा क्रमांक लागतो. आता मात्र सणासुदीच्या हंगामात वाहन उद्योगातील सर्वच कंपन्यांनी कात टाकली असून अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा लागली आहे. त्यासाठी विविध सवलतींचा भडिमार करण्यात येत आहे. तसे पाहता येत्या काळात वाहन उद्योगातील मंदीचा झाकोळ किंचितसा कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण आगामी काळात नवनव्या गाडय़ांचे लाँचिंग होणार असून त्यामुळे बाजारात चतन्य निर्माण होणार आहे.
आगामी काळात लाँच होणार असलेल्या गाडय़ा
* मिहद्रच्या एक्सयूव्ही ५०० चे नवे रूप ’ टाटांची डीझेल नॅनो  
* मारुतीची डीझेलवर चालणारी वाय 9   ’ निस्सानची डाटसन ’ फियाटचीही स्मॉल कार
दुचाकींमध्ये हीरो एकाच वेळी पाच गाडय़ांचे लाँचिंग करणार आहे.
बजाज त्यांच्या डिस्कव्हर आणि पल्सर यांच्या सुधारित आवृत्त्या बाजारात उतरवणार आहे. तर होंडाही स्कूटर आणि बाइकच्या नव्या रेंज लाँच करणार आहे. एकूणच येत्या काही काळात वाहन उद्योगाला सुगीचे दिवस अपेक्षित आहेत. शिवाय रघुराम राजन यांनीही पुढील पतधोरणात व्याजदरात दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे वाहनकर्जे स्वस्त होऊन गाडीखरेदीसाठी लोक पुढे येतील असाही
अंदाज आहे. त्यामुळेच ऑक्टोबर महिना या उद्योगक्षेत्रासाठी हिट ठरणार आहे.