संपूर्ण भारत स्वच्छ करण्याची हिंमत दाखवणे हे फारच धाष्टर्य़ाचे म्हटले पाहिजे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले. त्यांच्या स्वच्छ भारत अभियानची सुरूवात होऊन आज एक वर्ष झाले खरे, परंतु भारतातील नागरिकांच्या मानसिकतेत गेल्या ३६५ दिवसात किती फरक पडला, याच प्रश्नाचे उत्तर ‘फारसा नाही’, असेच द्यायला हवे. विकसित देशांत जाऊन आलेल्या प्रत्येक भारतीयाला परत आल्यानंतर आपला सारा देश अतिशय गलिच्छ वाटू लागतो. परदेशातील नागरिकांच्या मनात असलेली स्वच्छतेबद्दलची भावना मात्र ते परत येताना तेथेच विसरून येतात. भारतातील दारिद्र्यता अस्वच्छता निर्माण करते, असे सतत सांगण्यात येत असले, तरीही त्यात तथ्य नाही.

भारतीयांमध्ये या विषयाबद्दलची आस्था निर्माण करण्यासाठी लहान वयातच जे संस्कार करावे लागतात, ते करण्यासाठी शिक्षण देण्याची इच्छा आजवरच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी दाखवली नाही. शालेय शिक्षणात असलेला नागरिकशास्त्र हा विषय किती आस्थेने शिकवला जातो, हे पाहिले, तर अस्वच्छतेची बीजे सहज सापडू शकतील.

देश स्वच्छ करण्यासाठी केवळ मोठी आर्थिक तरतूद करून फारसा उपयोग नाही. सक्ती करणे पुरेसे ठरणार नाही आणि शिक्षा करून त्याची अंमलबजावणीही करता येणार नाही. कचरापेटीबाहेर कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे किंवा कचरा टाकणे ही भारतीयांची मानसिकता असते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणत असतानाच त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आचरणात आणण्यासाठी मात्र कोणालाही स्वत:पासून सुरुवात करण्याची इच्छा होत नाही. हे चित्र केवळ एक व्यक्ती बदलू शकणार नाही, त्यासाठी सर्वानाच कळत असलेले स्वच्छतेचे महत्त्व वळायलाही हवे.