03 June 2020

News Flash

जीवन-ध्येय

जीवनाला ध्येय असलंच पाहिजे. पण ध्येय नुसतं ठरून उपयोगाचं नाही. ते ध्येय योग्यही असलं पाहिजे.

चैतन्य प्रेम

जीवनाला ध्येय असलंच पाहिजे. पण ध्येय नुसतं ठरून उपयोगाचं नाही. ते ध्येय योग्यही असलं पाहिजे. ध्येय अयोग्य, त्यामुळे प्रयत्नही अयोग्य; मग त्याला समाधान कसं बरं लाभेल? आपल्याला कुणी विचारलं की, ‘तुमचं ध्येय काय?’ तर अगदी ठामपणे एकच ध्येय सांगता येईल का? प्रापंचिक माणसाचं ध्येय तर संसारातल्या चढ-उतारांनुसार बदलत असतं. म्हणजे ‘मुलाचं लग्न होऊ दे’ हे ध्येय अनेक दिवस प्रमुख होतं. मग लग्न झाल्यावर ‘सून चांगली असू दे’, ‘मूलबाळ होऊ दे’, ‘नातवंडांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळू दे’.. ते ‘नातवंडांची लग्नं पाहता येऊ देत’ इथपर्यंत ध्येयांची मालिका सुरू असते. बरं, प्रत्येक वेळी भूमिका काय असते? तर- ‘‘बाकी सगळं छान आहे, देवाची कृपा आहे, फक्त अमुक एक होऊ दे, बाकी काऽही मागणं नाही बघा!’’ प्रत्येक वेळी या अदृश्य अर्जातली ‘अमुक होऊ दे’ ही गाळलेली जागा नवनव्या उत्तरांनी भरली जात असते! पण या सर्वाची गोळाबेरीज केली, तर आपल्या ध्येयाचं एका वाक्यात वर्णन करता येतं : आपल्याला आनंदात जगायचं आहे! आपल्याला अडचणी नकोशा वाटतात, शारीरिक व मानसिक दु:ख नकोसं वाटतं. पण तरीही नेमकं ध्येयच उमगत नाही आणि त्यामुळे प्रयत्नांची दिशाही उमगत नाही. त्यातून सुख मिळण्याऐवजी दु:खच पदरात पडतं. कारण जीवनाचं खरं ध्येय कोणतं आहे आणि त्यासाठीचे अचूक प्रयत्न कोणते आहेत, हेच आपण गांभीर्यानं जाणून घेत नाही. एखादा माणूस होडीतून जात आहे आणि त्याला तहान लागली. मग होडीला छिद्र पाडलं तर बसल्या जागी पाणी मिळेल, या विचारानं त्यानं मोठे परिश्रम करून छिद्र पाडलं आणि तहान शमविण्याचा हमखास उपाय यशस्वी झाला म्हणून आनंद मानला, तर तो आनंद कितीसा टिकेल? तेव्हा आपल्या जीवनाचं खरं ध्येय काय आणि ते कसं साध्य करावं, हे जाणत्याकडूनच जाणून घेतलं पाहिजे. आता एखादा माणूस म्हणतो की, ‘‘मला गायक व्हायची इच्छा होती. त्यासाठी मी खडतर प्रयत्न केले, स्वरसाधना केली आणि मी गायक झालो!’’ याचप्रमाणे एखादा डॉक्टर होऊ इच्छित होता, एखादा चित्रकार होऊ इच्छित होता, एखादा अभिनेता होऊ इच्छित होता आणि ते त्या-त्या क्षेत्रात त्या-त्या पदी पोहोचलेही. पण ही खरी ‘ध्येयपूर्ती’ झाली, हे मात्र पूर्णपणे खरं नाही. याचं कारण त्यासाठीचे प्रयत्न जरी करावेच लागत असले व प्रयत्नांशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश अशक्य आहे हे जरी खरं असलं, तरी त्या क्षेत्रात त्या व्यक्तीचं जाणं हे प्रारब्धातही असल्यामुळे थोडय़ा प्रयत्नांनीही प्रारंभिक वाटचाल तरी सहज सुरू होते. अनेक ‘योगायोग’ही घडतात आणि त्या क्षेत्रातील आपल्या प्रगतीला गतीही मिळते. पण तरीही त्या-त्या क्षेत्रात यशस्वी होण्यात ध्येयपूर्ती मानता येत नाही. कारण त्या ‘ध्येयपूर्ती’नंतरही ‘आता काहीही नको’ ही भावना कधीच स्थिरपणे विलसत नाही! आणि या अतृप्तीतच तर जीवनाचं कोडं लपलेलं आहे!

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:05 am

Web Title: loksatta tatvabodh life goal article abn 97
Next Stories
1 जीवन विचार
2 प्रपंच वास्तव
3 अभक्ताची भक्ती
Just Now!
X