24 January 2021

News Flash

डॉक्टर, पोलीस, इसम वगैरे..

तमाशात जशी एक ‘मावशी’ असते तसा या लोकांचा एक ‘कोऑर्डिनेटर’ असतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

रूढार्थानं हे व्यक्तिचित्र नाही. पण या व्यक्ती मला अनेकदा भेटतात. आजही. आणि ज्या शूटिंगच्या ठिकाणी ही माणसं भेटतात तिथेही त्यांच्या पात्राला नाव नसतं. फुलपुडीवाला जसं तीन-चार झेंडू, एखादं जास्वंद पानात टाकल्यानंतर कुठलीतरी अनामिक पानं पुडीत डकवून ती पुडी भरतो, तशीच मालिकेच्या सेटवर ही माणसं असतात. त्यांना स्वत:चं अस्तित्व नसतं, पण फुलपुडी भरलेली वाटायची असेल तर जशी ती बिनवासाची फुलं-पानं महत्त्वाची असतात, तशीच ही माणसंही शूटिंग सेटवर गरजेची असतात. असो, नमनाचं घडाभर तेल संपत आलं. तर..

एक फोनकट.

‘‘हां.. मला उद्या एक डॉक्टर पाठव. आणि माणसांचा डॉक्टर दिसेल असाच पाठव हां.. टकल्या असेल तर उत्तम. टकली लोकं थोडी हुशार वाटतात रे! नाही.. नाही त्याला सांग कपडे स्वत:चे आणायचे. हां.. फॉर्मल शर्ट-पॅन्ट.. चपला नको. बूट! चष्मा असेल तर बेस्ट. चष्मेवाले त्यातल्या त्यात आणखी हुशार वाटतात रे! एखाददोन इंग्लिश वाक्यं बोलता यायला हवीत.. सकाळी दहापर्यंत यायला सांग त्याला. किती? सहाशे? चायला! अमिताभ बच्चनला पाठवतोयस का शाहरुख खानला? सहाशे रुपये डॉक्टरला? नाहीतरी करायचं काय आहे त्याला? बाप मेल्यागत चेहरा करून उभं राहायचं. हिरो आला की म्हणायचं ‘आय अ‍ॅम सॉरी.’ त्याचे सहाशे रुपये? चल चल! चारशे देतो. नाही. नाही चारशे फायनल! पुढल्या आठवडय़ात पोलिसांची रिक्वायरमेंट आहे तेव्हा तुझे सोडवून घे तू.. होलसेलमध्ये लागतील तेव्हा.. पोलीस, गुंड सगळेच! चल बाय.’

फोन संपतो. एका दैनंदिन मालिकेसाठी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहणारा तो जीव टकलावरचा घाम पुसतो आणि हातात पॅड घेऊन जाणाऱ्या असिस्टंट डायरेक्टरला सांगतो ‘डॉक्टर मागवलाय उद्यासाठी. आला की बघून घ्या!’

दैनंदिन मालिका या आता आपल्या लाइफस्टाइलचा एक भाग झाल्या आहेत. या मालिकांमध्ये घरातलं कोणीतरी म्हातारं माणूस छातीजवळ हात नेऊन आडवं पडतं, मग घरातले सगळे त्याला पिदडत हॉस्पिटलला नेतात, तिथे एक डॉक्टर असतो. किंवा नायकाला खोटय़ा आरोपाखाली अटक होते.. ती करायला एक पोलीस येतो. किंवा नायिकेच्या हालचालींवर लक्ष ठेवायला खलनायिका एका माणसाला सुपारी देते. या बिचाऱ्याला अखंड मालिकेत नावच मिळत नाही.  तो ‘एक इसम’ या लेबलाखालीच वावरत असतो. या अशा भूमिका करायला मालिकावाल्यांना माणसं लागतात. हीच ती कॅटॅगरी ‘डॉक्टर, पोलीस, इसम वगैरे..’ ही माणसं ज्युनियर आर्टिस्ट नसतात. टेक्निकली ‘ज्युनियर्स’ म्हणून काम करणारी माणसं ही इंडस्ट्रीतली एक वेगळीच संस्था आहे. ते खूप ऑर्गनाइज्ड आहेत, आणि वेळप्रसंगी दादागिरी करूनही ते आपल्याला हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेतात. पण या अशा छोटय़ा ‘एक सीन’ भूमिकांमध्ये काम करणाऱ्या मंडळींची मला नेहमीच दया येते.

तमाशात जशी एक ‘मावशी’ असते तसा या लोकांचा एक ‘कोऑर्डिनेटर’ असतो. हा साधारण चार ठिकाणी धक्के खाऊन काहीही न झालेला एखादा माजी नटच असतो. तो या माणसांना रोजंदारीवर इथेतिथे धाडत असतो. मग कधी डॉक्टर बनून, कधी कोर्टात जज बनून, कधी डावीकडून तिसरे शेजारी बनून ही मंडळी आपली अभिनयाची ‘खाज’ भागवत असतात. बरं ही अशी कामं करणारी मंडळी एरवी बऱ्या पगाराची नोकरी करत असतात, तिथे त्यांना बऱ्यापैकी मान असतो, ते सगळं सोडून इथे लष्काराच्या भाकऱ्या भाजायला का येतात? हा मला नेहमीच पडत आलेला प्रश्न आहे. मी काम करत असलेल्या एका मालिकेत असेच एका प्रसंगी इन्स्पेक्टरचं काम करायला एक गृहस्थ आले होते. ते बोलताना फार विचित्र अडखळायचे! झालं, सेटवरच्या इतर कलाकारांना कोलीतच मिळालं. पुढचे चार दिवस त्या बिचाऱ्या माणसाचा अक्षरश: बकरा केला होता सगळ्यांनी. मुद्दाम त्या बिचाऱ्याला कठीण कठीण शब्द बोलायला लावायचे. चौथ्या दिवशी मी आणि लोकेश गुप्ते त्या माणसाशी बोलत होतो. हेतू त्याची खेचण्याचाच होता, पण कशी कोण जाणे गाडी त्याच्या पूर्वायुष्याच्या रुळावर गेली. तेव्हा आम्हाला कळलं की तो माणूस एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठय़ा पोस्टवर कामाला आहे. काही वर्षांपूर्वी एका बस प्रवासात कुणीतरी त्यांना गुंगीचं औषध खायला घालून लुबाडलं. दोन दिवस ते गृहस्थ कुठल्यातरी हायवेच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडून होते. सुदैवानं वाचले. पण तेव्हापासून त्यांचा हा अडखळण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला! मला आणि लोकेशला तेव्हा थोबाडात मारल्यासारखं झालं होतं. मी न राहून त्यांना विचारलं ‘पण मग आता तुम्ही इथे असे छोटे रोल का करता?’ ते हसून म्हणाले ‘आवडतं. तुम्हा मोठय़ा लोकांबरोबर आपणही टी.व्ही.वर दिसतो. आवडतं. तेवढीच कॉलनीत माझ्या पोरांची कॉलर टाइट!’ कॅमेरा ही खरंच एक अजब गोष्ट आहे. त्या माणसानं आजपर्यंत आयुष्यात जे काही कमावलं होतं ते त्याच्या पोरांची कॉलर टाइट करणारं नव्हतं.. पण कॅमेऱ्यासमोर एका नगण्य भूमिकेत वावरल्यानं ती होणार होती!

पूर्वी चौगुले नावाचे एक काका असेच अनेक ‘सेट्स्’वर भेटायचे. चौगुले काका दिसायला गोरेगोमटे होते, त्यामुळे डॉक्टर वगैरे भूमिकांमध्ये फिट बसायचे. पण वाक्य म्हणायची वेळ आली की चौगुलेकाकांची गाळण उडायची. एका प्रसंगात चौगुलेकाकांना फक्त चेहरा पाडून ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन, एका प्रमुख पात्राच्या खांद्यावर हात ठेवून ‘आय अ‍ॅम सॉरी’ एवढंच म्हणायचं होतं. पण आठ टेक झाले तरी काका हे तीन शब्द नीट उच्चारू शकेनात! ते ऑपरेशन थिएटरमधून बाहेर यायचे, खांद्यावर हात ठेवायचे आणि मग कोळणीच्या फळीवर ठेवलेल्या ताज्या पापलेटासारख्या निर्जीव डोळ्यानं मुख्य कलाकाराकडे पाहत राहायचे. शेवटी दहाव्या टेकला जेरीनं आलेल्या दिग्दर्शकानं चौगुलेकाकांना सांगितलं ‘तुम्ही फक्त खांद्यावर हात ठेवा आणि मान हलवून निघून जा. प्रेक्षक हुशार आहेत. त्यांना कळेलच काय ते.’  पुढच्याच टेकला शॉट ओके झाला. एवढं होऊनही दरवेळी डॉक्टरचं काम आलं की चौगुलेकाकांनाच बोलावलं जाई. प्रॉडक्शन हाउसचं त्यांच्यावरचं हे प्रेम कळेना. एकदा मी विचरणा केली तेव्हा आमच्या प्रॉडक्शन मॅनेजरनं डोळा मारत सांगितलं ‘ते बिस्कीट फॅक्टरीत काम करतात. शूटिंगला येताना भरपूर बिस्किटं आणतात. त्यामुळे खास काही नसेल तर त्यांनाच बोलावतो आम्ही.’ डोळ्यासमोरून ट्रेन निघून गेलेल्या चुकार प्रवाशाच्या हताशपणे मी त्याच्याकडे पाहत राहिलो.

अशा मंडळीतून कधी कधी खरंच एखादा चांगला कलावंतही हाती लागतो, नाही असं नाही. तारुण्यात राज्य नाटय़ स्पर्धा, एकांकिका स्पर्धामधून काम केलेला, पण पोटापाण्याच्या उद्योगात या सगळ्यापासून दुरावलेला, असा कुणीतरी भुला भटका मुसाफीर कधी कधी पुन्हा अभिनयाच्या धक्क्याला लागतो आणि आपलं पाणी दाखवून जातो. पण असे अपवाद अपवादांनाच सापडतात. एरवी अशी बरीच मंडळी आहेत ज्यांना अभिनयातलं ओ का ठो कळत नाही, पण फक्त एकदा दिसायचं म्हणून ते या कोऑर्डिनेटरच्या घरचे उंबरे घासतात. मग त्यांच्या वाटय़ाला आलेली दोन वाक्यंही  त्यांना धड बोलता येत नाहीत. शूटिंगच्या वातावरणामुळे म्हणा किंवा कशामुळेही म्हणा ही माणसं बुजतात. मग डायरेक्टर चिडतो. तो प्रॉडक्शन मॅनेजरवर राग काढतो. प्रॉडक्शन मॅनेजर मग कोऑर्डिनेटरला फोन लावतो ‘काय माणसं पाठवतो रे तू? सालं एक वाक्य बोलतानाही बादलीभर हगतात. काय? चारशे रुपयात हेच येतं? मला शहाणपणा नको शिकवू. राहायचंय ना इंडस्ट्रीत? बरं ऐक, उद्या मढला नाइट आहे. पाच-सहा बायका लागतील. बऱ्या पाठव. सुरणाचे गड्डे नकोत. बायका रडायला हव्यात आणि मरायला दोन म्हातारे पाठव. किती? पाचशे? मुडद्याचे पाचशे? बापानं ठेवले होते? त्यापेक्षा मी पडेन तिरडीवर.. मुडद्यांचे दोनशे बायकांचे तीनशे.. वाक्यपण नाहीत. छाती बडवून रडायचंय फक्त. त्यात उद्या बुधवार! चिकनचं जेवण मिळेल त्यांना.. तीनशे फायनल!’ फोन ठेवून टकलावरचा घाम पुसत तो हेअरड्रेसरशी गप्पा मारायला निघून जातो. तिचा हात पाहून तिचं भविष्य सांगायचं असतं त्याला!

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2017 2:49 am

Web Title: chinmay mandlekar article on friend chougule kaka
Next Stories
1 केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)
2 केमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २
3 केमसे.. प्रॉडक्शन मॅनेजर
Just Now!
X