22 October 2019

News Flash

सोळा हजारपेक्षा अधिक मतदारांकडून ‘नोटा’चा  वापर

दिंडोरी तालुक्यातून २४५२ तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून १६,४२६ मतदारांनी ‘नोटा’चा अवलंब केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी ‘नोटा’ म्हणजे ‘नन ऑफ दी अबाव्ह’ हा पर्याय मागील लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून देण्यात आला. यंदा ‘नोटा’ पर्यायाची माहिती समजल्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर ‘नोटा’चा वापर झाला. या पर्यायाचा फटका अप्रत्यक्षरित्या उमेदवारांना बसला आहे. दिंडोरी तालुक्यातून २४५२ तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून १६,४२६ मतदारांनी ‘नोटा’चा अवलंब केला.

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यावयाची इच्छा नसल्यास नापसंती दर्शविण्यासाठी निवडणूक आयोगाने २०१४ पासून इव्हीएम यंत्रात ‘नोटा’ हे बटण देण्यात आले. या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात असलेला राजकीय पक्षाचा उमेदवार असो किंवा अपक्ष उमेदवार, त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्याचा पर्याय मतदारांना उपलब्ध झाला. मागील निवडणुकीत नाशिक जिल्ह्य़ाचा विचार केला असता ग्रामीणमधून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ८०० हून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. जिल्ह्य़ात वेगवेगळ्या भागातून नोटाचा अवलंब दोन हजार ६८८ मतदारांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत नाशिकमध्ये या आकडेवारीत कमालीची वाढ झाली आहे.

नाशिक मतदार संघात सिन्नर (६५३), नाशिक पूर्व (१२८७), नाशिक मध्य (१३००), नाशिक पश्चिम (१४३०), देवळाली (७३३), इगतपुरी (१५४९), टपाली मतदानात (२८) विभागातून सहा हजार ९८० मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला. दिंडोरी मतदार संघात नोटाचा वापर वाढला. मतदार संघात दिंडोरी (२४५२), नांदगाव (१६०९), कळवण (२०७६), चांदवड (१००३), येवला (११३६), निफाड (११५२), टपाली मतदान (१८) मध्ये नऊ हजार ४४६ लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

First Published on May 25, 2019 12:47 am

Web Title: use of nota from over sixteen thousand voters