लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यांमध्ये चालणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महायुतीने ४५+ जागा आम्ही जिंकू असा दावा केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३० ते ३५ जागा आम्ही जिंकू असं म्हटलं आहे. आज तर उद्धव ठाकरे यांनी आम्ही महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर विजय मिळवू असंही म्हटलं आहे. अशात एबीपी माझा आणि सी व्होटर्स यांचा सर्व्हे समोर आला आहे. महायुतीला काहीसा धक्का देणारा हा सर्व्हे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सांगतो एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हे?

एबीपी आणि सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला राज्यात १८ जागांवर तर महायुतीला ३० जागांवर यश मिळेल असं चित्र आहे. असं जरी असलं तरही बारामती, परभणी, माढा, हातकणगंले आणि मुंबईतल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतात असा अंदाज आहे. एबीपी माझा-सी व्होटर्सने ४८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण केलं होतं त्यानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुठल्या मतदारसंघातून कोण आघाडीवर असेल? काय सांगतो सर्व्हे?

नंदुबारमधून महायुतीच्या हिना गावित आघाडीवर असतील आणि त्या महाविकास आघाडीच्या गोपाल पडवींना मागे टाकतील. धुळ्यातून महायुतीचे सुभाष भामरे आघाडीवर असतील आणि महायुतीच्या शोभा बच्छाव यांना ते पिछाडीवर टाकतील असा अंदाज आहे. जळगावातून महायुतीच्या स्मिता वाघ या महाविकास आघाडीच्या करण पवारांना मागे टाकतील आणि जिंकतील असा अंदाज आहे. तर रावेरमधून श्रीराम पाटील यांचा पराभव करुन महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर असतील असा अंदाज आहे.

महायुतीला ३० जागांवर यश मिळेल असा अंदाज

बुलडाण्यातून महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडकर हे महायुतीच्या प्रतापराव जाधवांना पिछाडीवर टाकतील अशी शक्यता आहे. अकोल्यातून महायुतीचे अनुप धोत्रे हे महाविकास आघाडीच्या अभय पाटील यांना हरवतील असा अंदाज आहे. अमरावतीतून महायुतीच्या नवनीत राणा या महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंना पिछाडीवर टाकतील असा अंदाज आहे. वर्ध्यातून रामदास तडस हे महाविकास आघाडीच्या अमर काळेंना पिछाडीवर सोडतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मविआला १८ जागा मिळतील असा अंदाज

रामटेकमधून महायुतीचे राजू पारवे हे महाविकास आघाडीच्या रश्मी बर्वेंना पिछाडीवर टाकतील, तर नागपूरमधून महायुतीचे नितीन गडकरी हे मविआच्या विकास ठाकरेंना मागे टाकतील असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूरमधून प्रतिभा धानरोकरांना सुधीर मुनगंटीवार मागे टाकतील असा अंदाज आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे वैशाली दरेकरांना पिछाडीवर टाकतील असा अंदाज आहे. तर भिवंडीतून मविआचे सुरेश म्हात्रे कपिल पाटील यांना मागे टाकतील असा अंदाज आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांना मागे टाकतील असा अंदाज आहे. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे मागे टाकतील असा अंदाज आहे. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके मागे टाकतील असा अंदाज आहे. तर बीडमधून बजरंग सोनावणेंना पंकजा मुंडे मागे टाकतील असा अंदाज आहे. सांगलीतून संजयकाका पाटील हे मविआच्या चंद्रहार पाटील यांना मागे टाकतील असा अंदाज आहे.
तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक हे शाहू महाराज छत्रपतींना मागे टाकतील असा अंदाज आहे.

हे पण वाचा- Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, म्हणाले “तुमचे चेलेचपाटे..”

एबीपी माझा आणि सी व्होटर्स यांच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला राज्यात ४८ पैकी ३० जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडीला १८ जागांवर समाधान मानावं लागेल असं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु होण्यासाठी अवघे दोन ते तीन दिवस आहेत अशात हा अंदाज ४५ + चा नारा देणाऱ्या भाजपा आणि महायुतीचं टेन्शन वाढवणारा आहे यात शंका नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abp c voter opinion poll who will win maharashtra lok sabha election 2024 know in detail scj
First published on: 16-04-2024 at 20:54 IST