प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आहे. हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे विधानसभेतही अपयश येऊ नये म्हणून राज्य सरकारने तात्पुरता हा प्रकल्प स्थगित केला असला तरीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हाच मुद्दा आज (२९ जून) पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

“राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार असून पत्रादेवी बांदा (सिंधुदूर्ग) ते दीग्रज (वर्धा) अशा ८०५ किमी मार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. परंतु, या महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबत निवेदनही आले नव्हते. तरीही हा महामार्ग का होत आहे. याबाबत राज्य शासनाने तातडीने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?” असा प्रश्न आमदार सतेज पाटलांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत; संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “एखादी व्यक्ती…”!

त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, “या महामार्गाबाबत काही निवेदने आली होती. त्यानुसार, काही निवेदनात मागणी आहे की रस्ता झाला पाहिजे. तर काही जणांनी या प्रकल्पात बदल सुचवले आहेत. त्यामुळे, स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा करून पुढे या प्रकल्पाबाबत मार्गक्रमण केलं जाईल.”

त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनीही कोल्हापूरच्या वतीने त्यांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “कोल्हापूर हा सुपीक जिल्हा आहे. अनेक प्रकल्पांसाठी कोल्हापूरकरांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. पण सध्या शक्तीपीठाला पर्यायी मार्ग आहे. शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करणार असल्याचं जाहीर करणार का?” असं त्यांनी विचारलं.

शशिकांत शिंदेंच्या प्रश्नावर उत्तर देताना दादा भूसे म्हणाले, भूसंपादनाचा विषय फार पुढचा आहे. परंतु, आपल्याकडे समृद्धी महामार्ग झाला आहे. या महामार्गाने एक वेगळा नावलौकिक कमावला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महामार्ग महत्त्वाचे आहेत. या महामार्गांवर काही अपघात होतात. समृद्धी महामार्गावरच अपघात होतात असे नाही. ते तर खेडेगावातील रस्त्यांवरही होतात. अपघात होऊच नये अशी आपली भावना आहे.

हेही वाचा >> समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभागृह दोनवेळा स्थगित

ज्या महामार्गाच्या भूसंपदानचीही प्रक्रिया सुरू झाली नाही. तिथे कमिशन वगैरे घेतल्याचं बोलताना शरम वाटली पाहिजे, असंही दादा भूसे म्हणाले. शक्तीपीठ प्रकरणावरून राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. हा गोंधळ वाढल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हे सभागृह दोनवेळा स्थगित करावं लागलं.