समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे महाविकास आघाडीची साथ सोडून अजित पवारांबरोबर जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. २१ एप्रिलला त्यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सगळ्या चर्चांवर अबू आझमींनी उत्तर दिलं आहे.

अबू आझमींबाबत काय चर्चा रंगल्या ?

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी हे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या चर्चा रंगल्या. रविवारी त्यांनी प्रफ्फुल पटेल यांची भेट घेतली. या दोघांची मुंबईत बैठक पार डली. त्यानंतर काही दिवसांतच अबू आझमी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतील अशा चर्चा रंगल्या. अबू आझमी आणि प्रफुल पटेल यांची भेट झाल्यानंतर या चर्चांना चांगलंच उधाण आलं. या सगळ्या चर्चांवर अखेर अबू आझमींनी मौन सोडलं आहे.

हे पण वाचा- “ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!

काय म्हणाले अबू आझमी?

“समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव हे इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. त्यांनी हे सांगितलं होतं की समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळतील. मात्र एकही जागा मिळाली नाही. तसंच अल्पसंख्याकांपैकी एकाला तरी तिकिट मिळायला हवं होतं. मी या गोष्टीमुळे नाराज आहे. मात्र माझ्या नाराजीचा अर्थ हा नाही की मी पक्ष सोडतो आहे. माझी आणि प्रफुल पटेल यांची भेट मी घेतली. मात्र पक्षांतरांच्या काहीही चर्चा आमच्यात झाल्या नाहीत.” असं अबू आझमी म्हणाले आहेत. आज जितेंद्र आव्हाड यांनी अबू आझमींची भेट घेतली त्यानंतर अबू आझमींनी हे वक्तव्य केलं तसंच माझ्याबद्दल ज्या चर्चा होत आहेत त्यांना अर्थ नाही असं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“मी आज अबू आझमींना भेटायला आलो होतो. अबू आझमी आणि माझी एक महिन्यापूर्वी चर्चा झाली होती. ते संतापले होते की माझी का बदनामी केली जाते आहे? त्यावेळी मी स्वतः एक्स पोस्ट करत अबू आझमी कुठेही जाणार नाहीत. शरद पवार आणि त्यांचंही बोलणं झालं. मला शरद पवारांनी भेटायला सांगितलं होतं म्हणून मी आज अबू आझमींची भेट घेतली. मी सहज त्यांना भेटायला आलो आहे. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.