मुंबईच्या उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच अमोल किर्तीकर यांची करोना काळात खिचडी वाटपात कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) चौकशी सुरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल किर्तीकर यांचे वडील आणि विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. शिंदे गटाने अद्याप नाव जाहीर केलं नसलं तरी वायव्य मुंबईतून गजानन कीर्तिकरांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. स्वतः गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे की, मी माझ्या मुलाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी काल (दि. ११ एप्रिल) गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले.

गजानन किर्तीकर म्हणाले, “मी शिवसेनेत गेली ५७ वर्षे काम करत आहे. पण मी कधी लबाडी किंवा कपट-करस्थान केलं नाही. अमोल किर्तीकरांविरोधात मी प्रचार करणार आहे हे मी जाहीर केलं होतं, त्याप्रमाणे मी त्यांच्याविरोधात प्रचार करणार आहेच. पण अमोल किर्तीकर यांच्याविरोधात चालू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात. भाजपाने यंदा ‘४०० पार’चा असा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांनी ४०० जागांऐवजी संपूर्ण संसदच ताब्यात घ्यावी, मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे, ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती आहे.

हे ही वाचा >> संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज, भर सभेत म्हणाले…

गजानन कीर्तिकरांनी भाजपावर टीका केल्यानंतर यावर भाजपाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. भाजपाचे आमदार अमित साटम यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, सध्या असं वाटतंय की, गजानन कीर्तिकरांचे केवळ शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. मात्र त्यांचा आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. कीर्तिकरांनी एकदा ठरवावं की ते कोणाबरोबर आहेत. मोदींचा चेहरा वापरून भाजपा कार्यकर्त्यांच्या जीवावर ते दोनदा खासदार झाले. भ्रष्टाचाऱ्यांनी इडीला घाबरण्याची आवश्यकता आहे. जर कर नाही तर डर कशाला? अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात खिचडीच्या कंत्राटदाराकडून ९५ लाख रुपये आलेच का? याचं उत्तर द्यावं. भ्रष्टाचाऱ्यांना आता सुट्टी (मोकळीक) नाही, कारवाई तर होणारच!