पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मी दैवी अंश असल्याचं वक्तव्य केलं होतं. एका महिला पत्रकाराने मोदींना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचं उत्तर मोदींनी दिलं होतं. यावर आता काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत मी ईश्वराचं कार्य पूर्ण करण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराने “तुम्ही एवढं काम करता तर थकत का नाहीत?” असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मोदींनी आपला जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचं विधान केलं. “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे”, असं मोदी म्हणाले होते.

माझी आई जिवंत होती तोपर्यंत वाटायचं की…

“माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या निधनानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, परमात्म्यानंच मला पाठवलं आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानवी शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नाही तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो” याच वक्तव्याचा समाचार सलमान खुर्शीद यांनी घेतला आहे.

काय म्हणाले सलमान खुर्शीद?

“पाकिस्ताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. पण मग शाल पांघरुन नवाज शरीफ यांना भेटायला कोण गेलं होतं? तेव्हा कुणाचे चांगले संबंध होते? अशा गोष्टी तेव्हा केल्या जातात जेव्हा सांगायला काहीही नसतं. या सरकारने दहा वर्षांत जर चांगली कामं केली असती जी केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो आहे तर त्यांना हे सगळे मुद्दे काढायची आवश्यकताच भासली नसती. मोदी आमच्यावर टीका करत म्हणतात की काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगचा आहे. काँग्रेस असं का करेल ? या देशात हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन सगळ्याच धर्माचे लोक आहेत. सबका विकास आणि सबका विश्वास हे याच सरकारने म्हटलं होतं मग त्यात मुस्लिम समुदाय येत नाही का?” असा प्रश्न सलमान खुर्शीद यांनी विचारला आहे.

“एक निष्पाप प्रश्न”, म्हणत शशी थरुर यांची मोदींच्या ‘त्या’ विधानावर खोचक पोस्ट; म्हणाले, “एक दैवी व्यक्ती भारताच्या…”!

मुंगेरीलालच्या गोष्टी किती ऐकणार?

आता आमच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे कारण आत्तापर्यंत आमच्यासमोर माणसं एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आता तसं नाहीये एक माणूस स्वतःला म्हणतोय मी माणूस नाहीच. जैविकदृष्ट्या माझा जन्मच झालेला नाही. असं कुणी म्हणत असेल तर यावर काय उत्तर द्यायचं? आम्ही डीएनए टेस्ट करा म्हणू शकतो. कारण अशा गोष्टी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये केल्या जातात. कल्पनाविश्वात अशा गोष्टी बोलल्या जातात. आम्ही याबाबत काय उत्तर देणार? चीनने इतकी जमिनीवर कब्जा केला आहे, त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत. मुंगेरीलालच्या किती गोष्टी निवडणूक प्रचारात आम्ही किती ऐकायच्या आहेत? आता किमान मोदींनी या मुंगेरीलालच्या गोष्टी सांगणं बंद करावं अशी बोचरी टीका सलमान खुर्शीद यांनी केली आहे.