पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत आपली मते व्यक्त केली. यावर आता एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर कदाचित भविष्यातील नांदी असावी, असं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींच्या विधानावर खडसे काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. यावर ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं त्याचा अर्थ मलाही अद्याप समजलेला नाही. कदाचित भविष्यातील ती नांदी असावी. कारण त्यांनी जे विधान केलं ते जबाबदारीने केलेलं आहे. त्यांच्या या विधानामध्ये पुढची रणनीती ठरवण्याचा उद्धेश असावा”, अशी सूचक प्रतिक्रिया खडसेंनी दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत:ही अनेकदा माध्यमांना माहिती दिली आहे. मात्र, त्यांचा भारतीय जनता पक्षातील अधिकृत प्रवेश अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यांचा भाजपातील पक्षप्रवेश का रखडला? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे.

हेही वाचा : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”

भाजपा प्रवेश का रखडला?

“माझा भाजपा प्रवेश निश्चत असल्याचं मला विनोद तावडे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका होईपर्यंत मी थांबलो आहे. कारण काही जणांनी माझ्या पक्षप्रवेशाला नाराजी व्यक्त केली. आता या निवडणुका संपल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जाईल. त्यानंतर माझ्या पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर होईल”, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

…तरीही पुढील चार वर्ष आमदार राहणार

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. मात्र, ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनीच दिलेली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे आमदारकीचा राजीनामा देणार का? असा प्रश्न त्यांना विचारला जात होता. यावर आता त्यांनीच भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मी विधानपरिषदेचा आमदार आहे. मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शरद पवार यांनी माझा विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा घेणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुढचे चार वर्ष मी आमदार राहणार आहे. शरद पवार यांनी राजीनामा घेणार नाही, असं सांगितल्यामुळे दुसऱ्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.