ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. रविंद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आता ठाकरेंच्या अमोल कीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या रविंद्र वायकरांचा सामना रंगणार आहे.

शिवसेनेचे कट्टर नेते रविंद्र वायकर यांनी गेल्या महिन्यांत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना लोकसभेचं तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या जागेवरून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कीर्तिकर यांचे वडील आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. अमोल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महायुतीतून या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, रामदास कदम यांच्या मुलाचंही नावही या जागेसाठी चर्चेत होतं. यावरून कीर्तिकर आणि कदम यांच्यात शाब्दिक युद्धही रंगलं होतं. परंतु, महायुतीतून कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलं नाही. अखेर, महायुतीने आता रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा >> आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा

रविंद्र वायकर यांच्यावर आरोप

वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल वायकर यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जात असत. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे वायकर यांनी अध्यक्षपदही भूषविले होते. ठाकरे व वायकर कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर वायकर यांनी आधी क्लब व नंतर हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. यातून वायकर यांनी पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.