जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी सोमवारी ईशान्य (उत्तर-पूर्व) दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. ते काँग्रेसच्या तिकीटावर ही लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ईशान्य दिल्लीतून दोन वेळा खासदार झालेले अभिनेते मनोज तिवारी यंदा तिसऱ्यांदा येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. कन्हैय्या कुमार यांनी यंदा तिवारींना आव्हान दिलं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जासह सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे कन्हैय्या कुमार यांच्याकडील संपत्ती आणि त्यांच्यावरील एकूण खटल्यांची माहिती समोर आली आहे.

कन्हैय्या कुमार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण सात खटले चालू आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण ११ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. कन्हैय्या कुमार हे दिल्लीतले मतदार नाहीत. तसेच त्यांचं दिल्लीत कोणतंही घर नाही. ते बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातील मतदार आहेत. त्यांनी यंदा भरलेल्या आयटीआरनुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न केवळ १८,३२८ रुपये इतकं आहे. यासह त्यांनी २०२१-२२ मध्ये ७०,००० रुपये, २०२०-२१ मध्ये १.९६ लाख रुपये, २०१९-२० मध्ये ९० हजार रुपये आणि २०१८-१९ मध्ये १.६५ लाख रुपये इतकं उत्पन्न दाखवलं आहे.

जंगम मालमत्ता म्हणून त्यांच्या दोन बचत खात्यांमध्ये ८,०७,९६६ रुपये जमा आहेत. यापैकी एक बँक खातं जेएनयूच्या आवारातील एसबीआयच्या शाखेत आहे. तर दुसरं बेगूसरायमधील एका बँकेत आहे. स्थावर मालमत्ता म्हणून कन्हैय्या यांच्याकडे बेगूसरायमधील बिहाट येथे ८५.५ चौरस फूट बिगरशेती जमीन आहे. या जमिनची किंमत तिथल्या बाजारभावानुसार २.६५ लाख रुपये इतकी आहे. याशिवाय कन्हैय्या यांच्याकडे इतर कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही.

उत्पन्नाचं साधन काय?

कन्हैय्या कुमार यांच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दागिने, सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान धातूची कोणतीही वस्तू नाही. त्यांच्याकडे स्वतःचं वाहनदेखील नाही. त्यांच्या नावावर बँकेत एफडी, आरडी किंवा एसआयपीदेखील नाही. समाजसेवा आणि पुस्तकांची रॉयल्टी हेच त्यांचं उत्पन्नाचं साधन असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

कन्हैय्या कुमार यांच्यावर आसाम, बिहार आणि दिल्लीत एकूण सात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यापैकी कोणत्याही खटल्यात त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. यापैकी एक गुन्हा आसामच्या कामरुप जिल्ह्यात, चार गुन्हे बिहारच्या बेगूसरायमध्ये, एक गुन्हा बिहारची राजधानी पाटणा येथे तर एक गुन्हा दिल्लीत दाखल आहे.

हे ही वाचा >> काँग्रेसवाल्यांकडेच कोट्यवधींची रोकड कशी सापडते? पंतप्रधानांच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तुम्ही तर…”

दिल्लीतल्या सर्व सात लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात म्हणजेच २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता कन्हैय्या कुमार २३ मे पर्यंत दिल्लीत प्रचार करताना दिसतील.