“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की; नटसम्राट खासदार पाहिजे”, असा प्रश्न विचारून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला तितकेच धारधार असे प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिले आहे. शिरुर लोकसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचा नटसम्राट असा उल्लेख करून त्यांच्यावर निशाणा साधला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे काका अभियन क्षेत्रात नव्हते..

अजित पवार यांच्या नटसम्राट टीकेला डॉ. अमोल कोल्हेंनी उत्तर दिले आहे. मात्र हे करताना त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. माझे काका अभियन क्षेत्रात नव्हते, असे सुचवताना मला घराणेशाहीचा वारसा नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली. फेसबुकवर एक पोस्ट लिहून अमोल कोल्हे यांनी आकाशवाणीत काम करतानाचा एक जुना किस्सा सांगितला.

अमोल कोल्हे फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, “कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही. पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो, ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही. तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर… आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो. ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर…”

पुणे: तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की; नटसम्राट खासदार पाहिजे- अजित पवार

हडपसर येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, मागील पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही (अमोल कोल्हे) निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या (अमोल कोल्हे) सभांना अनेक ठिकाणी आलो आहे. परंतु पाच वर्षाच्या मध्येच डॉ. अमोल कोल्हे मला म्हणायला लागले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारचं नाही. दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता, मालिकेत काम करणारा कलावंत आहे. त्यामुळे माझं मोठं नुकसान होत आहे. यामुळं मला राजीनामा द्यायचा आहे.

“मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर एकच म्हटलं की, बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षांकरीता निवडून दिलं आहे. जरा कळ काढ, जरा कळ काढ, पाच वर्ष पूर्ण होऊ दे, पुन्हा नको उभा राहू बाबा, मी पुन्हा उभा रहा देखील म्हणणार नाही. पण आता त्यांना (अमोल कोल्हे) काय झालं की, पुन्हा जोर आणि बैठका सुरू केल्या”, असे सांगून अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp amol kolhe slams ajit pawar on natsamrat and karyasamrat jibe kvg
First published on: 14-04-2024 at 19:40 IST