पुणे : शिरुर लोकसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही (अमोल कोल्हे) निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या (अमोल कोल्हे) सभांना अनेक ठिकाणी आलो आहे. परंतु पाच वर्षाच्या मध्येच डॉ अमोल कोल्हे मला म्हणायला लागले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारच नाही.दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता, मालिकेत काम करणारा कलावंत आहे. त्यामुळे माझ मोठ नुकसान होत आहे. यामुळे मला राजीनामा द्यायचा आहे .मी त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर एकच म्हटले की, बाबा रे तुला लोकांनी पाच वर्षाकरीता निवडून दिले आहे. जरा कळ काढ, जरा कळ काढ, पाच वर्ष पूर्ण होऊ दे, पुन्हा नको उभा राहू बाबा, मी पुन्हा उभा रहा देखील म्हणणार नाही. पण आता पुन्हा त्यांना (अमोल कोल्हे) काय झाले आहे की, पुन्हा जोर आणि बैठका सुरू केल्या आहेत आणि आखाड्यात आल्याचे सांगत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा >>>बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार

तसेच ते पुढे म्हणाले की, त्यांनी (अमोल कोल्हे) किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता हवेली आणि शिरुर मतदार संघाला ठरवायचं, तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार पाहिजे, अशा शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मागील दहा वर्षात देश प्रगती पथावर जात आहे. या संपूर्ण दहा वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेली विकास काम नागरिकापर्यंत पोहोचवा, आपले मतदान कसे वाढेल याकडे अधिकाधिक लक्ष द्या, पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना यावेळी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar criticizes amol kolhe in shirur lok sabha meeting svk 88 amy