भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निवीर ही योजना लागू केली आहे. मात्र या योजनेला देशभरात अनेक ठिकाणांहून विरोध झाला. विरोधी पक्ष आणि देशातले बहुसंख्य युवक अजूनही या योजनेचा विरोध करत आहेत. काँग्रेसचा देखील या योजनेला पहिल्यापासून विरोध आहे. दरम्यान, आता काँग्रेसने या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आज त्यांनी महाराष्ट्रातल्या भंडाऱ्यात प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, देशात काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी बेरजोगारीचा मुद्दा मांडायचे आणि म्हणायचे देशातील २ कोटी तरुणांना रोजगार देणार. परंतु त्यांनी काहीच केलं नाही. उलट त्यांनी नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. अग्निवीर योजना आणली, या सगळ्यामुळे देशात होते तेवढे रोजगारही बंद झाले. त्यामुळे दोन गोष्टी मी आधीच स्पष्ट करतो. यांची जी अग्निवीर योजना आहे ती आम्ही आमचं सरकार येताच बंद करू. कारण आम्हाला एकाच देशात दोन प्रकारचे शहीद नकोत. एक शहीद, ज्याला सरकार पेन्शन देणार, शहिदाचा दर्जा देणार, त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करणा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या दुसऱ्या जवानाला मात्र शहिदाचा दर्जादेखील दिला जाणार नाही, त्या जवानाच्या कुटुंबाला भरपाई मिळणार नाही, पेन्शन मिळणार नाही. हा भेदभाव आहे.

राहुल गांधी म्हणाले, दोन तरुण देशासाठी बलिदान देतात, मग त्या दोघांच्या कुटुंबियांना सरकारने सारखीच वागणूक द्यायला हवी. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना बंद करणार. खरंतर ती योजना भारतीय सैन्याला नको होती. त्यांनी अशी योजना मागितलीच नव्हती. ही योजना पंतप्रधान कार्यालयाने बनवली आहे. त्यांनी ही योजना लागू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने सैन्याला सांगितलं तुम्ही अग्निवीर योजना लागू करा. देशातल्या कोणत्याही तरुणाला ही योजना नको आहे. पूर्वी देशात सैन्यभरती केंद्र होते, जे आता बंद पडलेत. कारण सर्वांना माहिती आहे की अग्निवीर झाल्यास पेन्शन किंवा इतर कुठल्याही सरकारी योजना मिळणार नाहीत. बलिदानानंतर शहिदाचा दर्जा मिळणार नाही. कॅन्टीनचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आम्ही ही योजना बंद करणार आहोत.

हे ही वाचा >> “कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत, संधी मिळताच…”, दहशतवादावर एस. जयशंकर यांची ठाम भूमिका

राहुल गांधी म्हणाले, मोदींनी देशात चुकीचा जीएसटी लागू केला आहे. या जीएसटीमुळे देशातले छोटे व्यापारी संपले. लहान आणि मध्यम उद्योगधंदे बंद पडले. पाच वेगवेगळे कर, दलाली खाणारा आणि खंडणी गोळा करणारा जीएसटी आम्ही बदलणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यावर देशात एक कर प्रणाली असेल. तसेच जनतेकडून कमीत कमी कर गोळा केला जाईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi says when congress government comes will stop agnipath scheme asc
First published on: 13-04-2024 at 19:24 IST