Lok Sabha Election 2024 Phase 1 : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला म्हणजेच भारतातल्या लोकसभा निवडणुकीला आज, शुक्रवारी (१९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. छत्तीसगडमधील बस्तरसारख्या नक्षली भागासह काही संवेदनशील मतदारसंघांमध्येदेखील आज मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेचा कारभार सांभाळत आहेत.

दरम्यान, या १०२ मतदारसंघांमधील मतदारांसह तिथल्या नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रांवर रांगेत उभे राहून मतदान केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीतही केली. यावेळी ते म्हणाले, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसेच तो आपला अधिकारदेखील आहे. त्यामुळे देशात १०० टक्के मतदान व्हायला हवं. मी सकाळीच माझा अधिकार बजावला. मी आज दिवसभरातलं माझं पहिलं काम केलं आहे.

हे ही वाचा >> सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय ३५ लाखांचं कर्ज, पार्थ पवारांच्याही ऋणी! निवडणूक प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा खुलासा

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून देशभरातील बहुतांश भागात दुपारी तापमानाचा पारा ४० अंशाच्या आसपास जातोय. नागपुरातही तीच परिस्थिती असल्यामुळे मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांग लावली आहे. मोहन भागवत यांनीदेखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, दुपारी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास न होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.