लोकभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज राज्यातील ११ जागांसह देशातील ९३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये बारामतीच्या लढतीकडे सर्वाधिक लक्ष असेल. तर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदूर्ग येथेही अटीतटीच्या लढतीची अपेक्षा आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि नारायण राणे यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे. २००९ पासून सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. तर, त्याआधी ही जागा शरद पवारांकडे होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियातही राजकीय मतभेद निर्माण झाले. सुप्रिया सुळेंविरोधात तगडा उमेदवार देण्याकरता अजित पवारांनी सुनेत्रा पवारांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. यावरून संजय राऊतांनी टीका केली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा बनवलंय

“बारामतीमध्ये विक्रमी मताधिक्क्याने सुप्रिया सुळे विजयी होतील. मला सुनेत्रा पवारांची दया येतेय. त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजाने त्यांना म्हणजेच एका गृहिणीला बळीचा बकरा बनवला. भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशात दारुण पराभवाच्या छायेत आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 3 Live : अजित पवारांनी काटेवाडीत, प्रणिती शिंदेंनी सोलापुरात मतदानाचा हक्क बजावला

नारायण राणेंच्याबाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल

दरम्यान, यंदा नारायण राणेही लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. नारायण राणे केंद्रात मंत्री असले तरीही ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्व असलं तरीही राणेंचाही तिथे चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे विद्यमान खासदार विरुद्ध केंद्रीय मंत्री अशी लढत येथे पाहायला मिळत आहे. यावरून संजय राऊत म्हणाले, “नारायण राणे यांच्याबाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल. तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केला आहे. कोकणातही केला आणि मुंबईतही केला. आता ते मोठ्या स्पर्धेत उतरलेत. पण विनायक राऊत पुन्हा एकदा लोकसभेत जातील. नरेंद्र मोदी येऊद्या किंवा अमित शहा येऊद्या महाराष्ट्रातील जनता हे आता सहन करणार नाही.”

हेही वाचा >> अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! आईबरोबर येत केलं मतदान, म्हणाले, “आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ..”

नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी मुंबईत भाड्याने घर घेतलंय

दरम्यान, पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबईत मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींनी पेडर रोडला घर भाड्यावर घेतलंय. अमित शाहांनी बोरीवलीत भाड्याने घर घेतलंय. त्यांना इथंच राहायचंय. मणिपूर आणि काश्मीर खोऱ्यात जायला त्यांच्याकडे वेळ नाही.त्यामुळे निवडणूक होईपर्यंत ते इथंच राहणार आहेत. पण तुम्ही कितीही खुंट्या ठोका, महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करता येणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.