लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात लक्षवेधी लढत आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातली लढत. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे शरद पवार विरुद्ध अजित पवार असंही पाहिलं जातं आहे. बारामतीत काय होणार? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातली वस्तुस्थिती काय आहे?

“महाराष्ट्रातली वस्तुस्थिती अशी आहे की तीन पक्ष आमच्या विरोधात होते. त्यातले दोन पक्ष आमच्याबरोबर आले. उरलेला काही भाग तिकडे राहिला आहे. आता आमच्याबरोबर तीन पक्ष आहेत आणि तिकडेही. तसंच आमच्यासह मित्रपक्षही आहेत. त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. निवडणुकीत जितका शक्ती संचय करता येईल तितका करायचा असतो” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

शरद पवार डाव टाकतात तेव्हा प्रतिडाव खेळावाच लागतो

शरद पवार मागची ५० वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र माहीत आहे. त्यांना त्यांची शक्तीही माहीत आहे. त्याचवेळी आपली शक्ती वाढवण्याची क्षमता जेव्हा संपते तेव्हा दुसऱ्याची शक्ती कमी करण्यासाठी काय करता येईल? हे पण त्यांना माहीत आहे. हळूहळू त्यांच्याशी संघर्ष करता करता आम्हीही काही गोष्टी समजल्या, आम्हीही शिकलो. आता महाराष्ट्र आम्हालाही तसाच माहीत आहे. लोकांना वापरुन फेकणारे आम्ही नाही. आम्ही लोकांना सांभाळणारे आहोत, त्यामुळेच लोक आमच्यासह येतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “डावाला प्रतिडाव खेळावाच लागतो, शरद पवार डाव खेळण्यात माहीर आहेत त्यामुळे आम्हाला अधिक सजग रहावं लागतं” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक प्रहार, “टरबूज कोण? मी त्यांना फडतूस, कलंक वगैरे..”

बारामतीत काय होईल?

“२०१४ आणि २०१९ ला बारामतीत जी धडक आम्ही मारली ती धडकी भरवणारी होती. प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. गेल्या पाच वर्षांत आमची शक्ती वाढलीच. जेव्हा युतीचं राजकारण करतो तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात. अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर घ्यायची आणि बारामती लढू नका म्हणायचं हे योग्य नाही. आम्ही बारामतीची जागा लढणार होतो मात्र अजित पवार आमच्यासह आले ती जागा त्यांना दिली.”

बारामतीत जिंकणार तर पवारच

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आणखी एक सांगतो बारामतीत जिंकतील तर पवारच. पण सुनेत्रा पवार जिंकल्या तर त्या मोदींसह आहेत. सुप्रिया सुळे जिंकल्या तर त्या राहुल गांधींबरोबर आहेत. पाच वर्षांत ३७० कलमापासून वेगवेगळ्या कायद्यांना विरोध करण्याचं काम सुप्रिया सुळेंनी केलं. देशहिताचे, देशभक्तीचे कायदे असूनही बारामतीचे खासदार विरोध दर्शवत होत्या. आता यातला फरक असा आहे की उद्या बारामतीत सुनेत्रा पवार जिंकल्या तर ३७० कलम हटवणाऱ्यांच्या बाजूने त्या उभ्या राहणार आहेत. राम मंदिर बनवणाऱ्यांच्या बाजूने त्या उभ्या राहणार आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा फरक आहे. दोन्ही पवारच आहेत दोन पवारांची विचारधारा आता भिन्न झाली आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढारी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will win baramati loksabha election devendra fadnavis gave the answer scj