Interim Budget 2024 Nirmala Sitharaman Saree केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान एक विशेष चर्चा रंगली ती म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या साडीची. निर्मला सीतारमण या गढवाल साड्या, ब्लॉक प्रिंटेड कॉटन आणि दक्षिण भारतीय सिल्क अशा वेगवेगळ्या साड्यांमध्ये वावरताना दिसतात. यंदा अर्थसंकल्प वर्षीच्या अर्थसंकल्पात त्या टसर सिल्कच्या साडीत दिसल्या. त्याच निमित्ताने त्यांच्या साडीचा रंग, प्रकार, नक्षीकाम हे चर्चेचे विषय ठरले आहेत. या निमित्ताने भारतीय राजकारण आणि साडी यांच्यातील ऋणानुबंध समजून घेणे माहितीपूर्ण ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते भारतीय राजकारणातील सक्षम स्त्री अशा विविध स्वरूपात भारतीय पारंपरिक साडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक भारतीय घरातील कपाटात असणाऱ्या या साडीने भारतीय महिला राजकीय नेत्या आणि संसद सदस्यांना सांस्कृतिक स्पर्शाने आपले प्रबळ अस्तित्त्व दर्शविण्यास नेहमीच मदत केली आहे. सत्ता आणि राजकारणाच्या कॉरिडॉरमधून वाटचाल करणाऱ्या प्रत्येक महिलेने साडीच्या परिधानाने आपले वेगळे अस्तित्त्व जोपासले आहे; नेहरू जॅकेट आणि स्टार्च केलेला कुर्ता पायजमा यांच्या गर्दीत आपले अधिपत्य दर्शविण्याचे काम गेले अनेक वर्ष भारतीय राजकारणात या साडीनेच केले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि साडी

इंदिरा गांधी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, तेव्हा त्यांनी साडीची निवड त्यांच्या आवडीची वेशभूषा म्हणून केली, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर साडी हीच त्यांची ओळख ठरली. ‘इंदिरा: इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकात, लेखिका सागरिका घोष यांनी एक प्रसंग नमूद केला आहे, इंदिरा गांधी या साडीच्या इतक्या चाहत्या होत्या की त्यांनी हत्तीवरून प्रवास करतानाही साडी परिधान केली होती. बनारसी साडी, आकर्षक स्लीव्हलेस ब्लाउज, कुरकुरीत कॉटन साडीवर परिधान केलेले प्रीपी स्वेटर अशा वेगवेगळ्या फॅशन शैलींच्या राजकारणातील उद्गाता म्हणून इंदिरा गांधी यांना मानले जाते, याच शैली पुढे जाऊन भारताच्या महिला प्रधान राजकारणाचा चेहरा ठरल्या.

अधिक वाचा: विश्लेषण: आधुनिक फॅशन ट्रेण्डमध्ये ‘इंडिगो ब्लू’ आला कुठून?

ममता बॅनर्जी आणि साडी

भारताच्या राजकीय परिदृश्यात साडीचे महत्त्व वर्षानुवर्षे वाढले आहे, प्रत्येक स्त्री राजकारण्याने विशिष्ट साडीसह स्वतःचे व्यक्तिमत्त्व दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी, निळ्या रंगाचा काठ असलेली पांढरी साडी हा त्यांच्या वैयक्तिक ब्रॅण्डचा एक भाग आहे. २०१८ साली त्यांनी अंबानी विवाह सोहळ्यात हजेरी लावली, त्यावेळस मात्र त्यांच्या साडीची चर्चा खासच रंगली. या लग्नात अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती, हिलरी क्लिंटनपासून ते जॉन केरी यांच्यापर्यंत सर्वच भरजरी कपड्यात दिसले. या सर्वात ममता बॅनर्जी मात्र त्याच्या पांढऱ्या साडीतच हजर होत्या, आणि त्यामुळे ही साडी त्यांची ओळख ठरली, आणि साडीच्या माध्यमातून त्यांनी आपले वेगळेपणही त्यांनी सिद्ध केले.

जयललिता आणि साडी

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासाठी, साडी हा केवळ कपड्यांचा एक पसंतीचा पर्याय नव्हता तर राजकीय शक्तीचा प्रसार करण्याचे एक माध्यम देखील होते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांत (१९८९), जयललिता यांच्यावर त्यांच्या प्रतिस्पर्धकांकडून हल्ला करण्यात आलेला. या हल्ल्यात त्यांची साडी ओढण्यात आली. त्यावेळी त्यांनी शपथ घेतली आता परतेन तर मुख्यमंत्री होऊनच. त्यानंतर १९९१ साली त्या निवडून आल्या, आणि त्यांनी सत्तेवर आल्यावर साडीला ढालीप्रमाणे स्वीकारले, त्यांच्या साडी परिधानाची पद्धत शक्तीचे प्रतीक ठरले.

याशिवाय स्मृती इराणी यांची साडीची निवडी हादेखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. लॅक्मे फॅशन वीक २०१९ मध्ये ब्लॅक आणि गोल्ड नंबरमध्ये त्यांनी हजेरी लावली होती, त्यावेळस त्यांनी चमकदार रंग आणि होमस्पन हाताने विणलेली साडी परिधान केली होती, त्यावर त्यांची नेहमीची टिकली हा त्यांच्या ओळखीचा भाग ठरला. त्यांनी नंतर पुढे राष्ट्रीय हातमाग दिनाच्या प्रचारात साड्यांबद्दलचे त्यांचे प्रेम दर्शवले होते. इंदिरा गांधींची नात प्रियंका गांधी या अनेकदा हाताने विणलेल्या कॉटन आणि ज्यूट सिल्कच्या साड्यांमध्ये दिसतात, त्याचबरोबर त्या लांब बाही असलेले ब्लाउजही घालतात. त्यांच्या या फॅशनबद्दल अनेक वर्षांपासून राजकीय समालोचकांनी टीका देखील केली आहे. सोनिया गांधी यांच्या साडीचीही विशेष चर्चा होते; त्यांना फिकट रंग, हाताळण्यास सोपे कापड आणि सुटसुटीत अलंकार आवडतात, विश्लेषकांच्या मते या सर्व आवडी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठी लाल टिकली आणि सिंदूरसह साडीवर स्लीव्हलेस जॅकेट परिधान करण्याचा ट्रेडमार्क स्थापित केला होता. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि केओंजार, ओरिसा येथील बीजेडीच्या खासदार चंद्राणी मुर्मू यांसारख्या राजकारणातील काही नवीन , तर काही मुरलेल्या महिला नेत्यांच्या निवडीमध्ये अधिक वेगळेपण दिसून येते. महुआ या विशेषतः, त्यांच्या उत्तम प्रकारे इस्त्री केलेल्या, अनेकदा ब्लॉक रंगकाम केलेल्या, हातमागाच्या साड्यांसाठी ओळखल्या जातात. सुप्रिया सुळे या बऱ्याचदा चमकदार पिवळ्या, गुलाबी आणि निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये दिसतात, त्यांचा महाराष्ट्राशी असलेला अनुबंध यातून प्रकट होतो.

साडी आणि राजकारण यांचे जवळचे नाते आहे, ज्या वेळेस भारतीय महिला राजकारणी साड्यांऐवजी पाश्चात्य कपडे निवडतात तेव्हा त्यांना ट्रोल केले जाते, त्या देशभक्त नसल्याचीही टीका केली जाते. महत्त्वाचे म्हणजे हा नियम पुरुषांसाठी ही लागू होतो, पाश्चिमात्य पॅन्ट आणि शर्ट पोशाखात असणाऱ्या राजकीय नेत्यांवर नेहमीच टीका केली जाते, असे एकुणात लक्षात येते. गेल्या दशकभरात देशभरात हिंदू राष्ट्रवादी भावना वाढल्याने, साडीला भारतीय राजकारणात आता धार्मिक अर्थाने अधिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance minister nirmala sitharamans blue sari in discussion why is sari a symbol of power for indian women politicians svs
First published on: 01-02-2024 at 16:04 IST