निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ‘ए, बी’ फॉर्म भरणे आवश्यक असते. कारण- निवडणूक प्रक्रियेत ‘ए, बी’ फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निवडणूक लढवायची असल्यास उमेदवाराला विविध कागदपत्रांची आवश्यकता असते; ज्यात देशाचे नागरिकत्व, वय आणि जात (जर ते राखीव जागेवरून निवडणूक लढवीत असतील तर), फौजदारी प्रकरणे, कुटुंबातील सदस्यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे भरावी लागतात. पण यात ‘ए, बी’ फॉर्मचे महत्त्व अधिक आहे. कारण- या फॉर्ममुळेच संबंधित उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. ‘एबी’ फॉर्म म्हणजे नक्की काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

एखाद्या विशिष्ट उमेदवाराला राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे हे ए व बी फॉर्मवरून सिद्ध होते. या दोन फॉर्मना एकत्रितपणे ‘एबी फॉर्म’ म्हणून ओळखले जाते. राजकीय पक्षाने तिकीट वितरणासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे, हे या दोन फॉर्मवरून स्पष्ट होते.

‘फॉर्म ए’ म्हणजे काय?

‘फॉर्म ए’ हा मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्याच्या राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये केला जाणारा एक अधिकृत संवाद आहे. हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून येतो; ज्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का असणे आवश्यक असते. फॉर्मवर पक्षाने तिकीटवाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरीही आवश्यक असते. पक्षाकडून दिल्या जाणार्‍या ‘फॉर्म ए’मध्ये उमेदवाराचे नाव, त्यांचे पक्षातील पद आणि चिन्ह यांची माहिती असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य असणे आवश्यक असते. अर्ज बाद झाल्यास पक्षाने जाहीर केलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेरदेखील जाऊ शकतो.

हेही वाचा : इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा?

‘फॉर्म बी’ म्हणजे काय?

‘फॉर्म बी’ हा उमेदवारासंदर्भातील असतो. राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या अधिकृत उमेदवारासह या फॉर्मवर पक्षाने सुचविलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते. ‘फॉर्म बी’मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात येते. याच उमेदवाराला पक्षाचे चिन्ह दिले जावे, असे या फॉर्मद्वारे सांगण्यात येते. उमेदवाराच्या नामांकन प्रक्रियेत एखादा उमेदवार नाकारला गेला, तर त्याच्या जागी या फॉर्ममध्ये असणार्‍या दुसर्‍या उमेदवाराला संधी दिली जाते. ‘फॉर्म बी’ हेदेखील प्रमाणित करतो की, ज्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे, ती राजकीय पक्षाची सदस्य आहे.

इच्छुक उमेदवारांनी केलेल्या सर्वात सामान्य चुका कोणत्या आहेत?

अधिकाऱ्यांच्या मते, उमेदवारांचा अर्ज वारंवार नाकारण्यात येण्याचे पहिले मुख्य कारण म्हणजे एबी फॉर्म आणि इतर कागदपत्रे सुपूर्द करण्यास उमेदवार उशीर करतात. फॉर्म नाकारण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे प्रतिज्ञापत्र पूर्ण माहिती न भरताच सुपूर्द करणे. अधिकार्‍यांचे सांगणे आहे की, राष्ट्रीय पक्षांचे फॉर्म ए व फॉर्म बीमध्ये सहसा चुका नसतात. त्यामुळे फॉर्म केवळ अंतिम मुदतीनंतर जमा केले असल्यास नाकारले जातात.

हेही वाचा : बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?

उमेदवारी अर्ज भरताना सर्व गोष्टी तपासल्या जातात. त्यात ए, बी फॉर्म सर्वांत महत्त्वाचे असतात. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले कुठलेही पक्ष (राज्य किंवा राष्ट्रीय) हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतात. निवडणूक अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत हे फॉर्म जमा करता येतात. त्यानंतर ते जमा केले गेल्यास ते ग्राह्य धरले जात नाहीत. अर्ज दाखल करण्याची नियोजित वेळ संपल्यानंतर अर्जांची छाननी केली जाते आणि उमेदवाराने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. त्यात ए, बी फॉर्मवरील राजकीय पक्ष, चिन्ह यांचीही तपासणी होते. दोन्ही फॉर्मद्वारे दिली गेलेली माहिती जुळल्यास संबंधित उमेदवाराला राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरले जाते. हे फॉर्म झेरॉक्स किंवा फॅक्स स्वरूपात जमा केल्यासही ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे निवडणुकीत याचे महत्त्व अधिक आहे.