कर्नाटकमधील हम्पी शहर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. हम्पीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातीलच एक प्राचीन मंदिर आहे विरुपाक्ष मंदिर. मंगळवारी (२१ मे) कर्नाटकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हम्पीमधील विरुपाक्ष मंदिराचा काही भाग कोसळला. त्यामुळे मंदिराच्या सालू मंटपचे (मंडपाचे) नुकसान झाले. काही संरक्षकांनी मंदिराच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) अधिकाऱ्यांना दोषी ठरवले.

परंतु, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, मंडपासह मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आधीच सुरू होते आणि हे काम पूर्ण होण्याआधीच पावसामुळे कोसळले. एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक आणि युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असलेल्या विरुपाक्ष मंदिराची निर्मिती सातव्या शतकात झाली, असे मानले जाते. या मंदिराचा इतिहास काय? या ऐतिहासिक वास्तूला कोणते धोके आहेत? मंदिराचा मंडप कशामुळे कोसळला? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हेही वाचा : यंदा भारतीयांनी गाजवला कान फिल्म फेस्टिवल; चित्रपटसृष्टीत याला इतके महत्त्व का? याची सुरुवात कशी झाली?

विरुपाक्ष मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व

विरुपाक्ष मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा (१३३६ ते १६४६) व्यापक विस्तार झाला, त्यावेळी विरुपाक्ष मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. १६ व्या शतकापर्यंत विरुपाक्ष मंदिर साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. विजयनगर साम्राज्य त्याच्या काळातील सर्वांत शक्तिशाली राज्यांपैकी एक होते. विजयनगरच्या शासकांच्या आश्रयाखाली विरुपाक्ष मंदिराची भरभराट झाली. विजयनगरचे शासक कलेचे संरक्षक होते. त्यांच्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठी हे मंदिर एक महत्त्वाचे केंद्र ठरले.

(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हे द्रविडीयन मंदिर स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विजयनगर साम्राज्याचा विध्वंस झाला तरी हे मंदिर सुरक्षित राहिले. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना वैशिष्टय़पूर्ण गोपुरम (उंच प्रवेशद्वार) आणि राज्याभिषेक मंडप बांधले गेले. मंडपाला कोरीव काम आणि शिल्पांनी सुशोभित केलेले अनेक खांब आहेत. त्यावर पौराणिक कथा, प्राणी आणि गोपुरम देवता आहेत. मंदिराच्या गर्भगृहात एक शिवलिंग आहे. इतिहासकार सांगतात की, सर्व मंदिरांमध्ये असे मंडप होते; जेथे व्यापारी वस्तू, उपासनेचे साहित्य विकायचे. कधी कधी मंदिरात येणारे भाविकही मंडपाखाली तळ ठोकून राहायचे.

हम्पीला आज दक्षिण भारतातील शेवटचे ‘महान हिंदू साम्राज्य’ म्हणून ओळखले जाते. युनेस्कोनेदेखील या शहराचे वेगळेपण ओळखले आणि हम्पी येथील स्मारक समूहाचे जागतिक वारसास्थळ म्हणून वर्गीकरण केले. विरुपाक्ष मंदिर पंपातीर्थ स्वामीस्थल या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे

विरुपाक्ष मंदिराचा मंडप कशामुळे कोसळला?

विरुपाक्ष मंदिराचा मंडप दगडी खांब वापरून बांधण्यात आला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळापासून पडणार्‍या पावसामुळे या खांबांची स्थिती बिघडली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या हम्पी सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ निहिल दास म्हणाले, “चार खांब असलेल्या १९ मीटर लांबीच्या मंडपातील केवळ तीन मीटरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. संपूर्ण मंडप जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आला होता आणि या खांबांना मजबूत पाया नसल्याचीही आम्हाला जाणीव होती. हे खांब किमान आणखी चार ते पाच वर्षे टिकतील, असा आमचा अंदाज होता; पण ते खूप लवकर कोसळले. हे दगडी खांब कित्येक शतकांपासून मुसळधार पावसात होते आणि मंडपाचा पायादेखील हळूहळू कमकुवत होऊ लागला होता; ज्यामुळे ते कोसळले,” असे दास यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावर संरक्षित असलेल्या हम्पीमधील ९५ स्मारकांपैकी ५७ स्मारकांची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विरुपाक्ष मंदिराचा जीर्णोद्धार कशा रीतीने केला जातोय?

राष्ट्रीय स्तरावर संरक्षित असलेल्या हम्पीमधील ९५ स्मारकांपैकी ५७ स्मारकांची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे. उर्वरित स्मारके राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यापूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व स्मारकांचे डिजिटल दस्तऐवजीकरण केले.

जीर्णोद्धाराचे काम २०१९ मध्ये सुरू झाले. या कामाचा पहिला टप्पा २०१९-२० मध्ये पूर्ण झाला आणि दुसरा टप्पा २०२२ मध्ये पूर्ण झाला. मंडपही नंतर पूर्ववत करण्यात येणार होता. मात्र, आता मंडपाच्या एका भागाचे नुकसान झाले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून संपूर्ण मंडप पाडून, जीर्णोद्धाराचे काम प्राधान्याने हाती घेतले जात आहे. घटनेनंतर लगेचच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या हम्पी सर्कलने वरिष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ, संरक्षक व अभियंते यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती स्मारकांचे नुकसान आणि जीर्णोद्धारासाठी आवश्यक तपासणी, त्यांचे पुनरावलोकन व दस्तऐवजीकरण करील. दास म्हणाले की, स्मारकांचे संरक्षण करण्यासह संरचनांचे आणखी नुकसान होणार नाही याची खात्री केली जात आहे. स्मारकाचे मूल्यांकन आणि जीर्णोद्धारासाठी निधीचा अंतिम अहवाल . ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’च्या महासंचालकांना सादर केला जाईल.

स्मारकांच्या जीर्णोद्धारात कोणती आव्हाने आहेत?

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले, “जीर्णोद्धाराचे काम हाती घेताना निधी, लॉजिस्टिक आणि मानव संसाधनाशी संबंधित समस्या ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.” दास यांच्या म्हणण्यानुसार, विजयनगर ते बिदरपर्यंत पसरलेल्या कल्याण कर्नाटक प्रदेशातील स्मारकांच्या जीर्णोद्धारासाठी केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये मंजूर केले होते.

हेही वाचा : जगभरात थैमान घालणारी झुरळांची ही प्रजाती आली कुठून? नव्या संशोधनात खुलासा

दगडी खांबांच्या जीर्णोद्धारासाठी सुरुवातीला वापरल्या गेलेल्या त्याच प्रकारच्या दगडांची आवश्यकता असते आणि ते काम पारंपरिक पद्धतीने केले जाते. ही प्रक्रिया बराच वेळ घेते. दास म्हणाले की, उद्ध्वस्त मंडप पुनर्संचयित करण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपये खर्च येईल आणि ते तीन ते चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

युनेस्को वेबसाइटने वारसास्थळाच्या जतनाबद्दल व्यापक चिंतादेखील नोंदवली आहे. “विरुपाक्ष मंदिरात सतत पूजा सुरू असते. त्यामुळे मंदिरसंकुलाच्या विविध भागांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परिसरात आधुनिक दुकाने आणि उपाहारगृहांची बेशिस्तीने वाढ होत आहे. तसेच, विरुपाक्ष मंदिरासमोरील प्राचीन मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यामुळे मंदिराच्या रचनेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.