German Cockroach झुरळ कीटकवर्गात मोडतात. स्वयंपाकघरांमध्ये, बंदिस्त खोलींमध्ये, घरात असणार्‍या छोट्या-मोठ्या फटींमध्ये झुरळं आढळून येतात. अनेकांच्या घरी तर झुरळं डोकेदुखी ठरतात. झुरळांमुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. त्यामुळे झुरळांना हाकलून लावण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का? जगभरात थैमान घालणारी ही झुरळं नेमकी आली कुठून? याचा शोध घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात काय माहिती समोर आली, त्यावर एक नजर टाकू या.

झुरळांमुळे होऊ शकतात अनेक आजार

झुरळांमध्ये काही प्रभावी कौशल्ये आहेत. ते वेगाने फिरू शकतात, लहान भेगा पार करण्यासाठी स्वतःचे शरीर त्यानुसार सपाट करू शकतात. त्यांच्या पायांच्या आणि नखांच्या विशिष्ट रचनेमुळे ते अगदी गुळगुळीत उभ्या पृष्ठभागावर चढण्यासदेखील सक्षम असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झुरळांचे शरीर लवचिक असते. ते आपल्या शरीराच्या ९०० पट जास्त वजनाच्या कीटकांचा सामना करण्यातही सक्षम असतात; ज्यामुळे इतर कीटकनाशकांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही.

हेही वाचा : ‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?

झुरळ ही एक मोठी समस्या आहे, कारण – झुरळ अनेक विषाणूंचा प्रसार करू शकतात. झुरळांमुळे ऍलर्जी, अतिसार, पोटांचे आजार, हेपाटायटीस ए, ऍन्थ्रॅक्स (बॅक्टेरियाजन्य रोग), साल्मोनेला (आतड्यांचा ताप) आणि क्षयरोगदेखील होऊ शकतो. झुरळांमुळे पाय आणि तोंडाचे आजारही पसरू शकतात.

झुरळ अनेक विषाणूंचा प्रसार करू शकतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

जगभरात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारे जर्मन झुरळ

जगभरात जर्मन झुरळांची प्रजाती सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते. प्रत्येक खंडावरील मानवी वस्तीमध्ये ही प्रजाती आढळते. हे झुरळ २ सेंटीमीटर (०.८ इंच) पर्यंत लांब असतात आणि विशेषतः रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. त्यांचा रंग तपकिरी असतो आणि ते ओल्या जागेवर आढळतात. ही प्रजाती जंगलात आढळत नाही. जर्मन झुरळाचे वर्गीकरण स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस यांनी ११७६ मध्ये केले होते, जेव्हा सात वर्षांच्या युद्धानंतर मध्य युरोपचा अर्धा भाग मोठ्या प्रमाणात दारिद्र्यात उदध्वस्त झाला होता.

जर्मन झुरळ नेमके आले कुठून?

निसर्गशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस यांनीच या कीटकाला जर्मन झुरळ असे नाव दिले, कारण त्यांनी जर्मनीतूनच या कीटकांचे नमुने गोळा केले होते. आतापर्यंत जर्मन झुरळ नक्की कुठून आले हे अस्पष्ट होते. परंतु, आता सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील कियान तांग यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने झुरळाच्या वंशाचा अभ्यास केला आणि ते कोठून आले व जगभरात कसे पसरले, याचा शोध घेतला. तांग आणि त्यांच्या संशोधकांच्या गटाने पाच खंडांतील १७ देशांतील २८१ झुरळांच्या डीएनए अनुक्रमांचा अभ्यास केला आणि त्यांची एकमेकांशी तुलना केली.

दक्षिण आशिया हेच मूळ

संशोधनात असे दिसून आले की, सुमारे २,१०० वर्षांपूर्वी आशियाई झुरळापासून जर्मन झुरळांची उत्क्रांती झाली. या दोन प्रजातींमध्ये आजही खूप साम्य आहे. संशोधकांच्या मते, या कीटकांनी मूळतः भारत आणि म्यानमारमधील मानवी वसाहतींना आपले घर केले. तिथून ही प्रजाती दोन मार्गांनी शतकानुशतके पश्चिमेकडे पसरली. सुमारे १,२०० वर्षांपूर्वी ही प्रजाती इस्लामिक राज्यांमध्ये पसरली. त्यानंतर सुमारे ४०० वर्षांपूर्वी युरोपियन वसाहतवादापासून, या प्रजातीचा ब्रिटन आणि विशेषतः नेदरलँड्समध्ये विस्तार झाला.

सुमारे २,१०० वर्षांपूर्वी आशियाई झुरळापासून जर्मन झुरळांची उत्क्रांती झाली. (छायाचित्र-रॉयटर्स)

१८ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जर्मन झुरळ आशियामध्येच होते, असे या गटाने अमेरिकन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नल ‘पीएनएएस’ मध्ये लिहिले. लांब अंतराच्या जागतिक व्यापारामुळे या झुरळाच्या प्रजातीला जगभरात पसरणे सोप्पे झाले. जर्मन झुरळ नंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उर्वरित जगामध्ये पसरले,” असे या संशोधनात पुढे आले आहे.

जर्मन झुरळांच्या संख्येत लक्षणीय वाढ

हे झुरळ ज्याही ठिकाणी गेले, तिथे त्यांना प्रत्येक घरांमध्ये असणारे गरम पाणी आणि अंतर्गत पाईपलाईनमध्ये असणारे उबदार वातावरण सोयीचे ठरले. त्यामुळे या कीटकांचा मृत्यूदर लक्षणीयरीत्या कमी झाला आणि अगदी थंड प्रदेशातही ते जिवंत राहू लागले. “या झुरळांनी स्वतःला शहरी वातावरणाशी जुळवून घेतले, त्यामुळे त्यांच्या प्रसार वाढला,” असे संशोधनात सांगण्यात आले. झुरळांना विशेषतः ओलसर, उबदार ठिकाण लागते, जे त्यांना मानवी वस्त्यांमध्ये सहज मिळते. या थंड रक्ताच्या कीटकांना कोरडेपणा सहन होत नाही.

हेही वाचा : अकरावी बारावीत आता इंग्रजीची सक्ती नाही; काय आहे नवीन अभ्यासक्रम आराखडा?

जर्मन झुरळ जगाच्या वसाहतीत पसरले याचे आणखी एक कारण संशोधकांनी स्पष्ट केले. इतर झुरळांच्या तुलनेत इतर कीटकनाशकांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. रसायने या झुरळांवर फारशी प्रभावी नसतात. काही महिन्यांतच ही झुरळं मोठ्या प्रमाणात पिल्लांना जन्म देऊ शकतात. झुरळाचे आयुष्य सरासरी फक्त तीन महिन्यांचे असते, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वेगाने विकसित होते.